नागपूर : जकात व त्यानंतर स्थानिक स्वराज्य कर (एलबीटी) बंद झाल्यानंतर महापालिकांच्या आर्थिक बळकटीसाठी वस्तू व सेवाकर (जीएसटी) भरपाईपोटी अनुदान दिले जाते. परंतु, गेल्या वर्षभरापासून राज्यातील २५ महापालिकांच्या जीएसटी अनुदानामध्ये कपात केली जात आहे. ही कपात अनुदानाच्या तुलनेत अल्प असली तरी छोट्या महापालिकांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारकडून मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगरसह २९ महापालिकांना दर महिन्याला २७०० ते २८०० कोटींचे अनुदान दिले जाते. ऑक्टोबर महिन्यातील २७९१ कोटींचे जीएसटी अनुदान नुकतेच महापालिकांना देण्यात आले. सर्वाधिक १२९४ कोटींचे जीएसटी अनुदान मुंबई महापालिकेला मिळाले, त्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नवी मुंबई महापालिकेचा क्रमांक लागतो. जकात कर व एलबीटी बंद झाल्यानंतर जीएसटी अनुदान महापालिकांचा आर्थिक कणा आहे.

आस्थापना खर्च यातूनच भागवला जातो. परंतु, गेल्या वर्षभरापासून मुंबई, नवी मुंबई, जालना, परभणी या महापालिकांना वगळून २५ महापालिकांच्या जीएसटी अनुदानातून उच्च क्षमतेच्या सक्शन व जेटिंग यंत्र आणि पाणी प्रक्रिया यंत्राच्या सुविधेच्या नावावर दर महिन्याला १ कोटी ६८ लाख ३४ हजार ७६९ रुपयांच्या जीएसटी अनुदानात कपात केली जात (पान २ वर) (पान १ वरून) आहे. शहरातील सांडपाणी, मोठे नाले आणि पावसाळी गटारांच्या स्वच्छतेसाठी राज्य सरकारने महापालिकांना हे यंत्र भाड्याने दिले आहेत.

जेटिंग मशीनद्वारे पाण्याचा मारा करून सांडपाणी, पावसाळी नाल्यांची स्वच्छता केली जाते तर सक्शन यंत्राद्वारे सांडपाणी शोषून घेतले जाते. या यंत्रांद्वारे स्वच्छतेची देयके महापालिकांकडून दर महिन्याला नगर विकास विभागाकडे पाठवली जाते. या विभागाकडून जीएसटी अनुदान वितरित करताना तेवढी रक्कम कपात केली जात असल्याचे सूत्राने नमूद केले. याबाबत नगर विकास २ चे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंद राज यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

शहराच्या स्वच्छतेची कामे महापालिकेची आहे. त्यासाठी महापालिकेकडून भाड्याने सक्शन व जेटिंग मशीन घेतली जाते. राज्य सरकारने स्वत:हून यंत्रे देऊन जीएसटी अनुदानात कपात करण्याचा निर्णय घेणे अनाकलनीय आहे. – सुरेंद्र टिंगणे, अध्यक्ष, राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन

महापालिकेकडे आठ मशीन आहेत. या मशीनद्वारे प्रत्येक झोनमध्ये सांडपाणी, पावसाळी नाल्यांची स्वच्छता केली जाते. केलेल्या कामाचा तपशील राज्य सरकारकडे पाठवला जातो. – डॉ. गजेंद्र महल्ले, मुख्य स्वच्छता अधिकारी, नागपूर महापालिका.