नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीने बैठक बोलावून जिल्हा काँग्रेस ग्रामीणच्या संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज बुधवारी नागपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीणची महत्त्वपूर्ण बैठक गणेशपेठ येथील पक्षाच्या कार्यालयात घेण्यात आली. सपकाळ यांनी स्पष्ट केले होते की, जिल्हा स्तरावर संभाव्य उमेदवारांची यादी तयार करून ती प्रदेश काँग्रेसकडे पाठवल्यानंतरच पुढील चर्चा आणि बैठका घेण्यात येतील.
या बैठकीला जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, माजी मंत्री आणि जिल्हा काँग्रेस ग्रामीण संघटनेवर मजबूत पकड असलेले माजी मंत्री सुनील केदार यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. केदार यांच्या गैरहजेरीमुळे जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
जिल्हा निवड समितीच्या सदस्यांना न जुमानता नगरपालिका, नगरपंचायत निवडणूकीसाठी परस्पर घेतलेल्या मुलाखतीची प्रक्रिया पुन्हा एकदा घेण्याच्या सूचना देत प्रदेश काँग्रेसने काँग्रेस नेते सुनील केदार, जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांना जोरदार झटका दिला आहे. तसेच १२ नोव्हेंबरला, बुधवारी विधानसभा प्रभारी, जिल्हा निवड मंडळातील सदस्यांना आमंत्रित करून पुन्हा बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या बैठकीनंतरच १३ नोव्हेंबरला राज्य निवड मंडळासमोर बोलावण्यात आले आहे.
नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात नागपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळाची बैठक झालेली नाही, अशी तक्रार प्रदेश कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून जिल्ह्याच्या निवड मंडळाची बैठक झालेली नाही. त्यामुळे बुधवारी मुंबईत होणाऱ्या राज्य निवड मंडळाच्या समोर जिल्ह्याच नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात चर्चा होणार नाही. त्यामुळे जिल्हा निवड मंडळाची बैठक १२ नोव्हेंबरला घ्यावी.
या बैठकीत जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी तसेच जिल्हा निवड मंडळातील सदस्यांना आमंत्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर १३ नोव्हेंबर, गुरुवारी दुपारी १२.३० वाजता राज्य निवड मंडळासमोर माहिती सादर करावी अशा सूचना प्रदेश काँग्रेसने दिल्या होत्या.
नागपूर जिल्ह्यातील २७ नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या निवडणूका २ डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने जिल्हा निवड समिती तयार केली आहे. त्यात आजी-माजी पदाधिकारी आणि वरिष्ठांचा समावेश आहे. त्यांच्या उपस्थितीत मुलाखती घेतल्या जाव्यात अशी पक्षाची अपेक्षा आहे. ग्रामीण काँग्रेसने गेल्या आठवड्यात शुक्रवारी कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखतींचे आयोजन केले होते. ते करताना त्यांना पक्षाच्या निवडणूक निरीक्षकांना बोलावले नाही.
तसेच पक्षातील विशिष्ट गटाचे कार्यकर्ते बोलावत त्यांच्या मुलाखती घेतल्या. या बैठकीची तक्रार पक्षातील दुसऱ्या गटाने थेट प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याकडे केली होती. यानंतर नागपूर ग्रामीणचे प्रभारी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासोबत जिल्हा प्रभारी उदय मघे आणि वरिष्ठ नेते अशोकराव बोबडे नागपुरात दाखल झाले होते. या बैठकीनंतर काँग्रेसमधील गटबाजी निवडणूकांच्या तोंडावर पुन्हा एकदा उघड झाली आहे.
