नागपूर: राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गेल्या आठ वर्षांत वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०१८ ते २०२६ या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (TET), आरोग्य विभागाच्या भरती परीक्षा, म्हाडा भरती आणि अलीकडील काही परीक्षांबाबत पेपरफुटी अथवा गैरव्यवहाराचे आरोप समोर आले. काही परीक्षा रद्द करून पुन्हा घ्याव्या लागल्या, तर अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होऊन तपास यंत्रणांनी कारवाई केली.
या परीक्षा सर्वाधिक चर्चेत
सर्वप्रथम २०१८ च्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता (TET) परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास पुढे उघडकीस आला. त्यानंतर २०२० च्या टीईटी परीक्षेत ओएमआर शीट आणि संगणकीय प्रणालीत फेरफार करून काही उमेदवारांचे गुण वाढवल्याचा आरोप झाला. या प्रकरणात अनेक अधिकारी, दलाल आणि उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. २०२१ हे वर्ष राज्यातील भरती परीक्षांसाठी सर्वाधिक वादग्रस्त ठरले. आरोग्य विभागाच्या गट-क भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच बाहेर आल्याचा आरोप झाला. त्यानंतर गट-ड भरती परीक्षाही पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर रद्द करून नव्याने घेण्यात आली. याच काळात म्हाडा भरती परीक्षाही कथित पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आली आणि संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवावी लागली.
तपासात अद्याप पेपरफुटी सिद्ध झालेली नाही
२०२६ मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा चर्चेत आली. परीक्षा होण्याच्या आदल्या दिवशी मूळ प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक करीत आहे. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक भरती परीक्षेबाबतही पेपरफुटीचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली असली, तरी अधिकृत तपासात अद्याप पेपरफुटी सिद्ध झालेली नाही. २०१८, २०२० आणि २०२६ मधील टीईटी, २०२१ मधील आरोग्य विभाग गट-क, गट-ड आणि म्हाडा भरती प्रकरणांमध्ये विविध टप्प्यांवर अधिकारी, कंत्राटी संस्थांचे प्रतिनिधी, दलाल आणि काही उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून अनेकांना अटकही करण्यात आली आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनी राज्यातील भरती प्रक्रियेत वारंवार समोर येणाऱ्या गैरव्यवहारांमुळे लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षांवरील विश्वास डळमळीत होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याबरोबरच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
२०१८ ते २०२६ : प्रमुख वादग्रस्त परीक्षा
२०१८ : महाराष्ट्र टीईटी – तपासादरम्यान गुणांमध्ये फेरफार आणि गैरव्यवहार उघड.
२०२० : महाराष्ट्र टीईटी – ओएमआर आणि सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून गुण वाढवल्याचा आरोप; अनेक अटक.
२०२१ : आरोग्य विभाग गट-क – प्रश्नपत्रिका परीक्षा पूर्वी बाहेर आल्याचा आरोप.
२०२१ : आरोग्य विभाग गट-ड – पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात आली.
२०२१ : म्हाडा भरती – कथित पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द.
२०२६ : महाराष्ट्र टीईटी – परीक्षा पूर्वसंध्येला प्रश्नपत्रिका जप्त; परीक्षा पुढे ढकलली; एसआयटी तपास सुरू.
२०२६ : एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षा – पेपरफुटीचे आरोप; चौकशीची मागणी, अधिकृत निष्कर्ष अद्याप प्रलंबित.
