वर्धा : राज्यात १९ जूनपासून सार्वत्रिक पोलीस भरती होत आहे. तसेच राज्य राखीव पोलीस दलाचीपण भरती होत आहे. या दोन्ही भरतीच्या मैदानी चाचणीच्या तारखा एकाच दिवशी किंवा सलग दिवशी लागून आल्या. त्यामुळे इच्छुक उमेदवार अडचणीत सापडले. त्यांच्या भविष्याचा विचार करून शासनाने पोलीस भरती व राखीव दलाच्या भरतीच्या तारखा बदलून द्याव्यात, अशी मागणी पुढे आली होती. त्याची दखल महाराष्ट्र पोलिसांनी घेतली आहे. पोलीस भरतीत ज्या उमेदवारांनी एकापेक्षा ज्यास्त पदांसाठी अर्ज केले आहेत व ज्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान चार दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील, असे महाराष्ट्र पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी परीक्षा १९ जूनपासून सूरू होत आहे. उमेदवारांना विविध पदांसाठी म्हणजे पोलीस शिपाई, चालक, बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग शिपाई, अशा एक किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येतात. त्यासाठी काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठ येणाऱ्या दिवशी दोन पदांसाठी मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याची स्थिती उद्भवू शकते. परिणामी काहींची गैरसोय होवू शकते. म्हणून असे सूचित करण्यात आले की, ज्या उमेदवारास एकाच वेळी दोन पदांसाठी मैदानी चाचणीस हजर राहण्याची सूचना मिळाली असेल असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहल्यानंतर त्या उमेदवारास दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी, असे निर्देश आहेत. दुसऱ्या ठिकाणी असलेल्या प्रमुखांनी अशा उमेदवाराची मैदानी चाचणी घ्यावी. तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख व दुसरी तारीख यात किमान चार दिवसांचे अंतर असावे. मात्र, एक अट आहे. उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता, याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागतील.

हेही वाचा…अंगणवाडी साहित्य घोटाळ्यातील आरोपी अधिकारी वनिता काळेंना अटकपूर्व जामीन नाहीच…

चार दिवसाच्या अंतराने चाचणी घेण्याचा हा मोठा दिलासा असल्याचे म्हटल्या जात आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या प्रशिक्षण व खास पथक या विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी हे निर्देश दिले आहेत. मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान चार दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील, असा हा निर्णय आहे.

विदर्भात बुधवारपासून पोलीस भरती

विदर्भात बुधवार, १९ जूनपासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारांना १९ जूनपासून शारीरिक चाचणी तसेच कागदपत्रे पडताळणीसाठी संबंधित जिल्हा पोलीस मुख्यालयात सकाळी ५ वाजतापासून बोलावण्यात आले आहे. उमेदवारांची १००, ८०० व १६०० मीटर धावण्याची चाचणी, उमेदवारांची उंची व छाती मोजण्यासाठी तांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात येणार आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला किंवा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा…अमरावती : छत्री तलावात बुडून दोघांचा मृत्‍यू; ईद साजरी करून गेले होते पोहायला

पावसाचे सावट

सध्या पावसाचे दिवस आहेत आणि त्यातच पोलीस भरती प्रक्रिया घेतली जात आहे. त्यामुळे मैदानी चाचणीदरम्यान पाऊस आला तर उमेदवारांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मैदानी चाचणीवेळी पाऊस आला तर उमेदवारांना पुढील तारीख दिली जाईल. उमेदवारांना काही समस्या किंवा अडचण असल्यास स्थानिक स्तरावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा…महिला भिंतीवर चढल्या अन् थेट न्यायाधीशांच्या बंगल्यात शिरल्या; पुढे झाले असे की…

तृतीयपंथी उमेदवारांचाही सहभाग

पोलीस भरती प्रक्रियेत तृतीयपंथी उमेदवारही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. तृतीयपंथी उमेदवार पोलीस भरतीत आपले नशीब आजमावत आहेत. ‘ते’ यशस्वी झाले तर पोलीस दलातील ती सामाजिक क्रांती ठरणार आहे.