नागपूर : राज्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. ३० जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पोलीस दलातील २ लाख २५ हजार ४६१ मंजूर पदांपैकी तब्बल २३ हजार ३२० पदे रिक्त आहेत. सर्वाधिक रिक्त पदे पोलीस शिपाई आणि पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील असल्याचे समोर आले आहे.

ही माहिती कशी समोर आली?

‘असोसिएशन ऑफ सोशल अँड आरटीआय ॲक्टिव्हिस्ट्स’ (आसरा) संस्थेचे अध्यक्ष संजय थुल यांनी माहिती अधिकारातून महाराष्ट्र पोलीस दलातील मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची माहिती मागवली होती. त्यावर महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयातील जनमाहिती अधिकारी तथा कार्यालय अधीक्षक सतीश जाधव यांनी ही माहिती उपलब्ध करून दिली.

एकूण किती पदे मंजूर आणि किती रिक्त आहेत?

३० जून २०२६ पर्यंत महाराष्ट्र पोलीस दलात २ लाख २५ हजार ४६१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २ लाख २ हजार १४१ पदांवर कर्मचारी कार्यरत असून २३ हजार ३२० पदे रिक्त आहेत.

सर्वाधिक रिक्त पदे कोणत्या संवर्गात आहेत?

पोलीस शिपाई संवर्गात सर्वाधिक १६ हजार ५१६ पदे रिक्त आहेत. या संवर्गात १ लाख २६ हजार ७०९ पदे मंजूर असून १ लाख १० हजार १९३ कर्मचारी कार्यरत आहेत.

पोलीस उपनिरीक्षकांची स्थिती काय आहे?

पोलीस उपनिरीक्षक संवर्गात ११ हजार ८८४ मंजूर पदांपैकी ९ हजार ६ पदे भरलेली असून २ हजार ८७८ पदे रिक्त आहेत.

इतर संवर्गांमध्ये किती रिक्त पदे आहेत?

सहायक पोलीस उपनिरीक्षक संवर्गात २० हजार ११९ मंजूर पदांपैकी १८ हजार ५५७ पदे कार्यरत असून १ हजार ५६२ पदे रिक्त आहेत. सहायक पोलीस निरीक्षक संवर्गात ४ हजार ७७९ मंजूर पदांपैकी ४ हजार ४९२ पदे भरलेली असून २८७ पदे रिक्त आहेत. पोलीस निरीक्षक संवर्गात ४ हजार २५३ मंजूर पदांपैकी ३ हजार ७३२ पदे कार्यरत असून ५२१ पदे रिक्त आहेत.

पोलीस हवालदार संवर्गात मंजूर पदांपेक्षा जास्त कर्मचारी कसे?

२५ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार पोलीस नाईक पदाचा पोलीस हवालदार संवर्गात समावेश करण्यात आला. त्यामुळे पोलीस हवालदार आणि पोलीस नाईक या दोन्ही संवर्गांतील ६१ हजार ७० मंजूर पदांच्या तुलनेत ६२ हजार ९५० कर्मचारी कार्यरत आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांची स्थिती काय आहे?

पोलीस अधीक्षक ते पोलीस महासंचालक संवर्गातील ४५४ मंजूर पदांपैकी ४२४ पदे भरलेली असून ३० पदे रिक्त आहेत. तसेच पोलीस उपअधीक्षक संवर्गातील ९७२ मंजूर पदांपैकी ७८७ पदे कार्यरत असून १८५ पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांबाबत काय मागणी करण्यात आली आहे?

संजय थुल यांनी राज्यातील वाढती लोकसंख्या आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेता २३ हजारांहून अधिक रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी केली आहे. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या निकषानुसार प्रति एक लाख लोकसंख्येमागे २२२ पोलिसांचे प्रमाण गाठण्यासाठी मंजूर पदसंख्या वाढवावी, यासाठी शासनाला निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.