नागपूर : राज्यात तापमान वाढत असल्याने विजेची मागणीही वाढत आहे. त्यातच महानिर्मितीचे नाशिक, कोराडी, खापरखेडा, पारस आणि चंद्रपूर येथील एकूण सहा वीजनिर्मिती संच तांत्रिक बिघाड व दुरुस्तीच्या कामांमुळे बंद पडल्याने वीज व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. मात्र, यापैकी चार संच पुढील १२ तासांत सुरू होतील, त्यामुळे चिंतेचे कारण नसल्याचा दावा महानिर्मितीने केला आहे.
महानिर्मितीतील सूत्रांच्या माहितीनुसार, २३ मे रोजी दुपारी १२.४० वाजता नाशिक औष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक ४ (२१० मेगावाॅट), कोराडी प्रकल्पातील संच क्रमांक ९ (६६० मेगावाॅट), खापरखेडा येथील संच क्रमांक ३ (२१० मेगावाॅट) व संच क्रमांक ५ (५०० मेगावाॅट), पारस वीज निर्मिती केंद्रातील संच क्रमांक ४ (२५० मेगावाॅट) तसेच चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रातील संच क्रमांक ६ (२१० मेगावाॅट) बंद होते. या सर्व संचांची एकत्रित वीज निर्मिती क्षमता २,०४० मेगावाॅट आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे वातानुकूलन यंत्रणा, पंखे, शेतीपंप तसेच औद्योगिक वापर वाढल्याने राज्यातील विजेची मागणी वाढत आहे. त्यामुळे महावितरण आणि ऊर्जा विभागासमोर अखंडित वीजपुरवठा राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे विजेच्या मागणीत शनिवारी किंचित घट झाली. त्यामुळे शनिवारी दुपारी १२.४० वाजता राज्यातील विजेची मागणी २६ हजार ५७७ मेगावाॅट होती. त्यात मुंबईतील ३ हजार ८९८ मेगावाॅट मागणीचा समावेश होता. त्याचवेळी राज्यात एकूण १६ हजार ५७८ मेगावाॅट वीज निर्मिती होत होती. केंद्राच्या वाट्यातून राज्याला ९,७६६ मेगावाॅट वीज उपलब्ध झाली होती, तर उर्वरित वीज खासगी कंपन्यांकडून मिळत होती.
वीज क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, बंद असलेल्या संचांची दुरुस्ती वेळेत पूर्ण न झाल्यास पुढील काही दिवसांत वीजपुरवठ्यावर परिणामाचा धोका आहे.
महानिर्मितीचे उत्पादन ५,६८२ मेगावाॅटवर
यंदाच्या उन्हाळ्यात महानिर्मितीचे वीज उत्पादन दररोज साधारण ७ हजार ते ७,५०० मेगावाॅटदरम्यान होते. मात्र, सहा संच बंद झाल्यानंतर शनिवारी दुपारी १२.४० वाजता उत्पादन घटून ५,६८२ मेगावाॅटवर आले.
महानिर्मितीचे अधिकारी आणि कर्मचारी बंद पडलेल्या संचांच्या दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. त्यापैकी चार संचांची दुरुस्ती पूर्ण होऊन ते टप्प्याटप्प्याने रविवारी सकाळपर्यंत कार्यान्वित होतील. त्यामुळे सध्या चिंतेचे कारण नाही. राज्याला गुणवत्तापूर्ण वीजनिर्मितीसाठी महानिर्मिती कटिबद्ध आहे. – अभय हरणे, संचालक (संचलन), महानिर्मिती, मुंबई.
