नागपूर: राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन नुकतेच शांत झाले असताना आता प्राध्यापक संघटनांनी सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीतील संदिग्धता, प्राध्यापकांच्या कार्यभाराबाबतची अनिश्चितता आणि नोकरीच्या सुरक्षिततेचा प्रश्न यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स ऑर्गनायझेशनने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मागे घ्यावे किंवा या धोरणानुसार वाढलेला अध्यापनाचा कार्यभार मंजूर करावा, अशी मागणी करत थेट नवीन शैक्षणिक धोरणाच्या विरोधात बंड पुकारले आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत यावर समाधानकारक निर्णय न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

मूळ विषय काय?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी राज्यातील विविध विद्यापीठांनी २०२३-२४ या शैक्षणिक सत्रापासून घाईघाईत केली. मात्र, धोरणातील अनेक बाबी स्पष्ट नसल्याने २०२६-२७ या शैक्षणिक सत्रापासून पुन्हा बदल करावे लागले. परिणामी, गेल्या चार वर्षांपासून उच्च शिक्षण क्षेत्रात गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका विद्यार्थी आणि प्राध्यापकांना बसत असल्याचा आरोप संघटनेने केला. अभ्यासक्रमातील बदल, विषयांचा वाढलेला व्याप आणि अध्यापनाच्या कार्यभाराबाबत स्पष्ट नियम नसल्यामुळे प्राध्यापकांची पदे अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या सगळ्या गोंधळामुळे पदवी अभ्यासक्रमांतील विद्यार्थिसंख्येतही घट झाल्याचा दावा संघटनेने केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे अनेक विषयांसाठी आवश्यक शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना काही विषयांचे अध्यापन आणि प्रात्यक्षिकांपासून वंचित राहावे लागल्याचा मुद्दा संघटनेने उपस्थित केला. काही विषयांचा कार्यभार मंजूर नसल्यामुळे ते शिकवण्याची जबाबदारी कोणाची, याबाबतही संभ्रम आहे. पूर्वी मंजूर असलेल्या पदांसाठीदेखील नव्या धोरणाचा आधार घेत अंशकालीन प्राध्यापकांच्या नियुक्त्यांना मंजुरी नाकारली जात असल्याचे प्राध्यापकांचे मत आहे. विद्यापीठ प्रशासनापासून राज्य शासनापर्यंत विविध स्तरांवर केवळ मौखिक आश्वासने दिली जात आहेत. मात्र, प्राध्यापकांच्या नोकरीची सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करणारा कोणताही स्पष्ट लेखी आदेश किंवा शासन निर्णय अद्याप जारी झालेला नाही. त्यामुळे प्राध्यापकांमध्ये असुरक्षिततेची भावना आणि असंतोष वाढत असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. हे निवेदन नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंसह राज्यपाल आणि राज्य सरकारलाही देण्यात आले आहे.

कार्यभार मंजुरीसह २५ मागण्या

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील विविध अभ्यासक्रमांसाठी असलेले सर्व घटक अध्यापनाच्या कार्यभारात ग्राह्य धरावेत आणि त्यासाठी आवश्यक पूर्णवेळ शिक्षकांच्या पदांना मंजुरी द्यावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. पूर्णवेळ भरतीचा निर्णय होईपर्यंत तासिका तत्त्वावरील किंवा कंत्राटी प्राध्यापकांच्या नियुक्त्यांना परवानगी द्यावी, सध्या कार्यरत असलेल्या प्राध्यापकांची पदे सुरक्षित ठेवून रिक्त पदांवरील भरतीला मंजुरी द्यावी, असे संघटनेने म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना ऐच्छिक विषय निवडण्याबाबत स्पष्टता देणे आवश्यक आहे. विविध विद्यापीठांतील अभ्यासक्रमांच्या रचनेतील फरक लक्षात घेऊन कार्यभार मंजुरीत विद्यापीठांना लवचीकता द्यावी आणि पदवीच्या तीन वर्षांच्या तसेच चौथ्या वर्षातील सन्मान पदवीच्या अभ्यासक्रमांचा कार्यभार निश्चित करणे आवश्यक आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत शासनाची स्पष्ट भूमिका किंवा समाधानकारक निर्णय न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल. -प्रा. डॉ. ओमप्रकाश चिमणकर, अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स ऑर्गनायझेशन.