‘एमपीएससी’चे शेकडो उमदेवार परीक्षेला मुकणार?

करोनामुळे शासकीय कार्यलये बंद असल्याने अनेक उमेदवारांकडे ‘नॉन क्रिमिलीयर’ नसल्याने त्यांना अर्ज अद्ययावत करता आला नाही.

: MPSC Exam 2021, MPSC Exam 2021 September 4
(संग्रहित फोटो)

|| देवेश गोंडाणे

संकेतस्थळावरील तांत्रिक गोंधळ

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी तब्बल दोन वर्षांनी परीक्षा घेतली जाणार असतानाही आयोगाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक गोंधळामुळे शेकडो उमेदवार परीक्षेपासून मुकणार आहेत. २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा शुल्क ऑनलाईन जमा करूनही ते एमपीएससीच्या प्रोफाईलमधील तांत्रिक गोंधळामुळे जमाच झाले नाही (फीस नॉट पेड) असा संदेश येत होता. यावर आयोगाने एक-दोन दिवसांत हा गोंधळ दूर होईल असे सांगितले. मात्र, मुदत संपल्यावरही हा प्रश्न सुटला नसून आता आयोगाकडून उमेदवारांना तुमचे पैसे परत केले जातील असे उमेदवारांना सांगितले जात आहे. आयोगाच्या या चुकीमुळे उमेदवारांची परीक्षेची संधी हुकणार असल्याने प्रंचड रोष आहे.

‘एमपीएससी’तर्फे करोनानंतर तब्बल दोन वर्षांनी जाहिरात काढण्यात आली. २९० पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा २ जानेवारी २००ला घेण्यात येणार असून ५ ऑक्टोबरपासून २८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली. मात्र, करोनामुळे शासकीय कार्यलये बंद असल्याने अनेक उमेदवारांकडे ‘नॉन क्रिमिलीयर’ नसल्याने त्यांना अर्ज अद्ययावत करता आला नाही. त्यामुळे मुदतवाढीची मागणी करण्यात आली. यानंतर आयोगाने उमेदवारांना २ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. अनेक उमेदवारांनी २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीमध्ये अर्ज केला. अर्ज पूर्ण झाल्यावर यासाठी आवश्यक ते परीक्षा शुल्कही जमा करण्यात आले. ऑनलाईन शुल्क भरताना बँकेकडे पैसे जमा झाले. विद्यार्थ्यांच्या खात्यातून पैसे यशस्वीरित्या वळते झाल्याचा संदेशही उमेदवारांना आला. मात्र, एमपीएससीच्या संकेतस्थळावर पैसे जमाच न झाल्याचे दाखवत होते. एमपीएससीच्या संकेतस्थळावर तांत्रिक गोंधळ असल्यामुळे उमदेवारांकडून पैसे भरले गेल्यानंतरही ते जमा होत नव्हते. त्यामुळे उमेदवारांनी आयोगाशी संपर्क केला असता ही अडचण दूर करून तुमचा अर्ज स्वीकारला जाईल असे सांगण्यात आले. मात्र २ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांच्या प्रोफाईलवर पैसे जमाच झाले नाही. पैसे जमा झाल्याशिवाय अर्ज पूर्ण होत नाही. त्यामुळे चिंताग्रस्त उमेदवार आता आयोगाशी संपर्क केला असता तुमचे पैसे परत केले जातील, असे सांगितले जात आहे. आयोगाच्या चुकीमुळे उमेदवारांचा अर्ज पूर्ण झाला नसून आता पैसे परत करण्याची भाषा केली जात असल्याने प्रचंड रोष असून तांत्रिक चुकांमुळे शेकडो उमेदवारांना परीक्षेला मुकावे लागणार आहे.

ऑफलाईन शुल्क भरूनही समस्या

एका उमेदवाराने सांगितले की, ऑफलाईन शुल्क भरण्याची मुदत ३ नोव्हेंबर होती. तांत्रिक गोंधळामुळे २ नोव्हेंबरपर्यंत पैसेच जमा झाल्याचे दाखवत नसल्याने त्याने बँकेत (चालान पद्धतीने) पैसे भरले. मात्र, ते भरूनही आयोगाच्या संकेतस्थळावर पैसे जमा होत नसल्याचे त्याने सांगितले. या गोंधळामुळे त्याची परीक्षेची संधी गेल्याने आयोगाने उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

संकेतस्थळावर कुठलीही तांत्रिक अडचण नाही. अनेकदा उमेदवार सूचना पूर्णपणे न वाचता अर्ज भरत असल्याने अशा चुका होतात.  – सुनील अवताडे, उपसचिव एमपीएससी. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra public service commission examinations after two years for pre service examination hundreds of candidates due to technical glitches on the commission website akp

Next Story
नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदासाठी गडकरी-फडणवीस समर्थकांमध्ये चढाओढ
ताज्या बातम्या