वर्धा : राज्यातील शाळा १५ जून पासून सूरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. पण हे पर्व भर उन्हाचे म्हणून प्राथमिक शिक्षक समितीने विदर्भातील शाळा या तारखेपासून नकोच, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आणि ती मान्य पण झाली. विदर्भात आता ३० जून पासून शाळा सूरू होणार. मात्र विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पण १५ जून पासून शाळा सूरू करणे शक्य नाही. कारण उष्माघाताचा धोका आहेच, अशी भूमिका राज्य मुख्याध्यापक संघटनेने घेत किमान सकाळच्या सत्रात शाळा सूरू ठेवावी, असे शासनास सुचविले. त्याचे निवेदन गेले पण उत्तर नाही. काही आमदारांनी पण संघटनेच्या या मागणीस जाहीरपणे उचलून धरले. पण परवानगी आली नाहीच.
या जिल्ह्यात मागणी लागू
रायगड जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळेत तात्काळ बदल करण्यात आला असून, दुपारच्या सत्राऐवजी आता या शाळा सकाळी भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी दिले आहेत. हा आदेश १९ जून २०२६ पासून ते ३० जून २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’ आणि ‘एल निनो’चा प्रभाव
भारतीय हवामान विभाग (IMD), मुंबई यांनी दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, रायगड जिल्ह्याला सध्या उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे मान्सून अद्याप रायगड जिल्ह्यात पूर्णपणे दाखल झालेला नाही. प्रतिकूल हवामानाचा सर्वाधिक फटका शाळकरी मुलांना बसण्याची शक्यता निर्माण झाली.
आपत्ती व्यवस्थापनांतर्गत निर्णय
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. नैसर्गिक आपत्तीपूर्वी आणि त्यादरम्यान योग्य ती मदत व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी या प्राधिकरणाची असते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करणे किंवा वेळेत बदल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा विचार करून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केलेल्या विनंतीनुसार, जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी विद्यार्थी हिताला प्राधान्य देत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. दुपारच्या सत्रात चालणाऱ्या सर्व शाळा आता केवळ सकाळच्या सत्रातच भरवल्या जातील.
वाढत्या उन्हामुळे मुलांना होणारा शारीरिक त्रास, डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक मानला जात आहे. जिल्हा प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ व काटेकोरपणे करण्याचे निर्देश सर्व शाळा व्यवस्थापनांना दिले आहेत.
शिक्षक नेते म्हणतात…
रायगड जिल्हा प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे, असे मत मुख्याध्यापक संघटनेचे प्रदेश नेते सतीश जगताप यांनी व्यक्त केले. ते म्हणतात की आमच्या संघटनेने शिक्षण खात्यास सकाळच्या सत्रातच सध्या उर्वरित विदर्भातील शाळा भरविण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. कारण उन्ह कमी झालेले नाही. त्याचा त्रास दुपारच्या सत्रात होतोच. पण शासनाने निर्णय दिला नाही. पण परिस्थिती पाहून स्वतःच्या अधिकारात सकाळी शाळा सूरू करण्याचे अधिकार रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी वापरले. ते अभिनंदनस पात्र ठरतात. तसेच सिंधुदुर्ग शिक्षणाधिकारी यांनी सकाळीच शाळा ठेवण्याची परवानगी दिली. आता तरी शासनाने आमचे मत समजून घ्यावे, असे सतीश जगताप म्हणतात.
