नागपूर : गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने १४ आणि १५ सप्टेंबरला अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

राज्यात पावसाला पोषक वातावरण

राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण असून, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. १४ सप्टेंबरला कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, उत्तर किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहू शकतात. मध्य महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे.

१५ सप्टेंबरलाही पावसाचा जोर कायम

१५ सप्टेंबरलाही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत तसेच मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस होऊ शकतो. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील काही भागांसह नाशिक घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून, काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, बीड, हिंगोली आणि नागपूरसह काही भागांतही पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आणि गणेशमूर्तींच्या आगमन-विसर्जनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतपिकांवर परिणाम

पावसामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सोयाबीन, कापूस आणि मका या खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा, तसेच काढणीला आलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी मोकळ्या शेतात, रानात किंवा मोठ्या झाडाखाली थांबू नये. किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर प्रवास करताना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

विदर्भातही पावसाच्या सरी

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत सोमवारी अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांतही काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. पुढील काही दिवसांत पावसाचे क्षेत्र झपाट्याने कमी होण्याचा अंदाज आहे. १५ सप्टेंबरनंतर विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाऐवजी तुरळक सरी राहण्याची शक्यता आहे.