नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून काहीसा ओसरलेला पाऊस पुन्हा जोर धरण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, पुढील दोन दिवस अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
कमी दाबाचा पट्टा कायम
आज (१२ सप्टेंबर) राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही भागांत ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या दक्षिणेकडे सरकला आहे. राजस्थानपासून मध्य प्रदेश, छत्तीसगडमार्गे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत हा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण कोकण आणि लगतच्या अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, दक्षिण कर्नाटक ते मन्नारच्या आखातापर्यंतही कमी दाबाचा पट्टा कायम आहे.
‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा
आज पालघर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, वाशीम, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. वादळी पावसाच्या काळात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः शेतकऱ्यांनी शेतात काम करताना आणि नागरिकांनी मोकळ्या परिसरात असताना काळजी घेणे आवश्यक आहे.
१३ सप्टेंबरला पावसाचा जोर वाढणार?
दरम्यान, पुढील २४ ते ४८ तासांत पावसाचा जोर काही भागांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, १३ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून, मराठवाड्यातही काही भागांत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण-गोवा विभागातही १३ सप्टेंबरला जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात १२ सप्टेंबरला दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास वादळी पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. १३ सप्टेंबरला मुंबईत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील प्रणालीकडे लक्ष
बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या प्रणालीची वाटचाल आणि त्याची तीव्रता यावर महाराष्ट्रातील आगामी पावसाचे स्वरूप अवलंबून राहणार आहे. सध्या राज्यातील अनेक भागांत वातावरण ढगाळ असून, दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास वादळी पावसाची शक्यता वाढत आहे.
विदर्भातही पावसाचा इशारा
विदर्भात १२ सप्टेंबरला जोरदार पावसासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. मात्र १३ सप्टेंबरपासून विदर्भातील इशाऱ्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
