नागपूर : राज्यातील बहुतांश भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आता पुन्हा मान्सून सक्रिय होण्याचे संकेत आहेत. बंगालच्या उपसागरात पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम म्हणून १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची तीव्रता अधिक

कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार, उत्तर कोकण तसेच दक्षिण कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात विखुरलेल्या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ९ ते १२ ऑगस्टदरम्यान कोकणात पावसाची शक्यता कायम राहणार असून, त्यानंतर काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाच्या सरींची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो.

घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका

हवामान खात्याच्या ‘इम्पॅक्ट-बेस्ड फोरकास्ट’नुसार जोरदार पावसाच्या काळात सखल भागांत पाणी साचणे, स्थानिक पूरस्थिती निर्माण होणे, जुने किंवा कमकुवत बांधकाम कोसळणे, झाडे उन्मळून पडणे तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असते. घाट परिसरात मुसळधार पाऊस झाल्यास भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात सरासरीपेक्षा दोन टक्के अधिक पाऊस

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, राज्यात आतापर्यंत ६३७.१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. या कालावधीत राज्याची सरासरी ६२२.७ मिलीमीटर असून, आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे दोन टक्के अधिक पाऊस झाला आहे. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, सरासरीच्या तुलनेत हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.

तळकोकणात संततधार; धरणसाठ्यात वाढ

दरम्यान, तळकोकणात पावसाची संततधार सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांत पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,६०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसात ३० टक्के तूट आहे. सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी भातशेतीची लागवड पूर्ण केली आहे. तिलारी धरण ८३.१२ टक्के भरले असून, धरणातून तिलारी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील १५ लहान-मोठ्या धरणांमध्ये पाणीसाठा वाढला असून, काही धरणांच्या सांडव्यांवरून पाणी वाहत आहे. जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये सध्या सुमारे ८१ टक्के पाणीसाठा आहे.