अनिल कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राज्यात मानवी तस्करीच्या (ह्युमन ट्रॅफिकिंग) गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून याबाबतीत महाराष्ट्र देशात  दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर तेलंगणा राज्याचा क्रमांक लागतो. देहव्यापारासाठी मुलींची सर्वाधिक तस्करी होते. ही धक्कादायक माहिती ‘एनसीआरबी’च्या अहवालातून समोर आली आहे.

मानवी तस्करीसारख्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मानवी तस्करी रोखण्यासाठी राज्यात ४९ जिल्ह्यात ४५ मानवी तस्करी विरोधी पथकांची (एएचटीयू) स्थापना पोलीस महासंचालकांनी केली आहे. मानवी तस्करी करणाऱ्या अनेक टोळय़ा असून कमी वेळात बक्कळ पैसा कमावण्यासाठी तस्करी केली जाते. मानवी तस्करीमध्ये सर्वाधिक अल्पवयीन मुली आणि तरुणींचा समावेश आहे. मुलींकडून देहव्यापार करवून घेणे, बालविवाह लावून देणे, मुलांना भीक मागायला बाध्य करणे, नवजात बाळाची विक्री करणे, मुलींकडून घरगुती काम, मजुरी किंवा बळजबरी कामाला लावणे किंवा लैंगिक शोषण करण्यासाठी मुली व तरुणींची तस्करी केली जाते, एनसीआरबीच्या अहवालानुसार, मानव तस्करीचे  महाराष्ट्रात ३२० गुन्हे दाखल आहेत. पहिल्या स्थानावर असलेल्या तेलंगणा राज्यात ३४७ गुन्हे दाखल आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आसाम व केरळ राज्य आहे. गरीब कुटुंबीयांना हेरून काही रक्कम देऊन त्यांच्या अल्पवयीन मुलींना देहव्यापार आणि लग्न करण्यासाठी अन्य राज्यात नेले जाते. तसेच तरुणींना मॉडेलिंग, चित्रपटात किंवा टीव्ही मालिकांमध्ये काम देण्याच्या नावावर मुंबई, दिल्लीसारख्या शहरात नेले जाते.   अल्पवयीन मुलींची विक्री करून त्यांना निर्धारित वेळेपूर्वी लैंगिक परिपक्व करण्यासाठी रासायनिक पदार्थ किंवा इंजेक्शन देऊन बळजबरीने देहव्यापार करून घेतला जातो.

अन्य काही कारणे..

देशातील काही राज्यात वेगवेगळय़ा उद्देशासाठी मानवी तस्करी करण्यात येते. राजस्थानमध्ये मुलींचे प्रमाण कमी असल्यामुळे मुलगी अल्पवयीन असतानाच तिची  विक्री केली जाते. केरळ, कर्नाटक राज्यात रुग्णाची सेवा करणाऱ्या महिला-तरुणींची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना नोकरीचे आमिष देऊन तस्करी करण्यात येते.  आसाम, मणिपूर राज्यातील तरुणी सौंदर्यप्रसाधन विक्री करणाऱ्या कंपन्या किंवा पंचकर्म, फिजीओथेरपी सारख्या कामासाठी आणून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेतला जात असल्याची माहिती आहे.

‘एएचटीयू’ची भूमिका

मानवी तस्करी विरोधी पथकांची (एएचटीयू) नजर शहरातील तस्करी करणाऱ्या टोळय़ांवर असते. हे पथक नवजात बाळ विक्री किंवा अल्पवयीन मुलींची देहव्यापारासाठी विक्री करणाऱ्या टोळय़ाच्या हालचालींवर लक्ष ठेवून असते. नागपूर एएचटीयूने नवजात बाळ विक्रीचे राज्यातील पहिले प्रकरण शोधून काढले होते, हे विशेष.

आकडेवारी काय सांगते?

राज्य       गुन्हे

तेलंगणा – ३४७

महाराष्ट्र –  ३२०

आसाम – २०३

केरळ – २०१

आंध्रप्रदेश – १६८

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra ranks second human trafficking girls prostitution shocking information ncrb report ysh
First published on: 28-09-2022 at 00:02 IST