महेश बोकडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राज्यात २०२० या वर्षांच्या तुलनेत २०२१ मध्ये अपघातांची संख्या १८ टक्के तर अपघाती मृत्यूंची संख्या १७ टक्क्यांने वाढली आहे.  २०२० च्या तुलनेत वर्ष २०२१ मध्ये सर्वाधिक अपघात पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद येथे वाढल्याचे परिवहन खात्याच्या अहवालातून पुढे आले आहे.राज्यात २०२० मध्ये २४ हजार ९७१ अपघात नोंदवण्यात आले. 

या अपघातांमध्ये ११ हजार ५६९ जणांचा मृत्यू तर १९ हजार ९१४ नागरिक जखमी झाले. ही संख्या २०२१ मध्ये वाढली. २०२१ मध्ये राज्यात २४ हजार ४९३ अपघात झाले. त्यात १३ हजार ५२८ नागरिकांचा मृत्यू तर २३ हजार ६९ नागरिक जखमी झाले. त्यामुळे २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये राज्यात अपघातांमध्ये १८ टक्के, अपघाती मृत्यूंमध्ये १७ टक्के, जखमींच्या संख्येत १६ टक्के वाढ नोंदवण्यात आली.

दरम्यान, पुणे शहरात २०२० मध्ये ४८२ अपघात, १४३ मृत्यू, ३८८ जखमी नोंदवले गेले. ही संख्या २०२१ मध्ये ७४१ अपघात, २५५ मृत्यू, ५५६ जखमी नोंदवली गेली. त्यामुळे येथे अपघातात ५४ टक्के, मृत्यूत ७८ टक्के, जखमीच्या संख्येत ४३ टक्के वाढ झाली. ही संख्या पुणे ग्रामीणला कमी होती. तर कोल्हापुरात २०२० मध्ये ७५३ अपघात, ३२० मृत्यू, ६६९ जखमी नोंदवले गेले. ही संख्या २०२१ मध्ये १ हजार ३१ अपघात, ३८१ मृत्यू, ९९४ जखमी अशी नोंदवली गेली. त्यामुळे येथे अपघातात ३७ टक्के, मृत्यूत १९ टक्के, जखमींमध्ये ४९ टक्के वाढ नोंदवली गेली.  औरंगाबाद ग्रामीणला २०२० मध्ये ४६१ अपघात, २६६ मृत्यू, ३०८ जखमी नोंदवले गेले. ही संख्या २०२१ मध्ये ६०१ अपघात, ४०५ मृत्यू, २८६ जखमींवर गेली. त्यामुळे येथे अपघातात ३० टक्के, मृत्यूत ५२ टक्के वाढ तर उलट जखमींच्या संख्येत ७ टक्के घट नोंदवली गेली.

करोना काळात वाहने घरीच  होती. त्यांचा वापर आता वाढला, परंतु तांत्रिक दोष, वाहन चालवण्याचा काहींचा सराव कमी होणे, व्यावसायिक वाहनांच्या योग्यता तपासणीला वेळोवेळी मिळणारी मुदतवाढ अशी काही कारणे यामागे असू शकतात. परंतु,  नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळल्यास  अपघात टाळणे शक्य आहे. 

डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त, मुंबई.

वर्षनिहाय अपघातांची स्थिती    

शहर          २०२०   २०२१ 

मुंबई शहर      १८१२   २२३० 

नाशिक शहर    ४१६    ४७० 

पुणे ग्रामीण     १२३०  १३६३  

नागपूर शहर      ७७३  ९५८  

नागपूर ग्रामीण    ७७४   ९६९

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra recorded 18 percent increase in road accidents zws
First published on: 09-08-2022 at 02:55 IST