नागपूर : राज्यातील आदिवासी पाडे व दुर्गम भागात आजही वैद्यकीय सेवा देण्यासाठी आवश्यक संख्येने नवीन डाॅक्टर मिळत नाही. दुर्गम भागात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ संवर्गातील १९५ डॉक्टर २५ वर्षांपासून पदोन्नतीपासून वंचित आहे. त्यापैकी बरेच अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. पदोन्नती होत नसल्याने ग्रामीण भागात नवीन डाॅक्टर सेवा द्यायला तयार कसे होणार? हा प्रश्न आहे. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.
राज्यातील दुर्गम, अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील शेवटच्या नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा देण्याचे काम वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ करतात. त्यात बाह्यरुग्ण सेवा, आंतररुग्ण सेवा, सर्पदंश, आकस्मिक सेवा, गरजेनुसार शवविच्छेदन, प्रसूती. यासोबतच लसीकरण, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, आयुष्मान भारत कार्ड योजना आदींचे नियोजन हेच डॉक्टर करतात. परंतु, वर्षानुवर्षे सेवा दिल्यावररही पदोन्नतीबाबत याच डॉक्टरांवर अन्याय होत आहे.
पदोन्नतीचा लाभ न घेता अनेक डॉक्टर सेवानिवृत्त झाले आहे. सध्या सुमारे ७५० डाॅक्टर कार्यरत असून त्यापैकी १९६ जण पदोन्नतीसाठी पात्र आहे. या सर्वांची वरिष्ठता सूची तयार होऊन पदस्थापनेसाठी नागरी सेवा मंडळाची बैठकही झाली. त्यानंतरही या डाॅक्टरांना पदोन्नतीचे आदेश नाही. त्यातच वर्धेच्या एका डाॅक्टरची निवृत्ती दोन दिवसांवर आली होती. त्यामुळे आरोग्य खात्याने त्यांच्या पदोन्नतीचे सोपस्कार आटोपले. परंतु, १९५ डाॅक्टरांना अद्याप पदोन्नती नाही. त्यामुळे उर्वरित सर्व डाॅक्टरांना निवृत्तीच्या दोन दिवसांपूर्वी पदोन्नती मिळणार काय? हा प्रश्न महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी महासंघाने उपस्थित केला आहे.
आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही
वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’ संवर्गातील या डॉक्टरांच्या विषयावर आरोग्य विभागाचे सचिव क्र. १ विनायक निपुण आणि संचालक डाॅ. अंबाडेकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघाचे म्हणणे काय ?
दुर्गम भागात आधीच डाॅक्टर मिळत नाही. विशेष म्हणजे, तेथे सेवा द्यायला तयार असलेल्यांना पदोन्नती दिली जात नाही. २५ वर्षांपासून पदोन्नती नसलेले बरेच डाॅक्टर सध्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. त्यांची संपूर्ण सेवा एकाच पदावर शासन काढणार काय? तातडीने पदोन्नती न मिळाल्यास आंदोलन केले जाईल, असे महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघाचे राज्य अध्यक्ष डॉ. अरुण कोळी यांनी सांगितले.
