नागपूर : चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत राज्यातील रस्ते अपघातांच्या संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत जेमतेम १ टक्का आणि मृत्यूत ५ टक्क्यांची घट नोंदवली गेली. मात्र काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये अपघातांचे प्रमाण वेगाने वाढले आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, नवी मुंबई, कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील क्षेत्रांचा समावेश आहे.

मुंबई जवळील मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस क्षेत्रात रस्ता अपघातांचे प्रमाण सर्वाधिक २१ टक्क्यांनी वाढले. त्या खालोखाल गडचिरोली जिल्ह्यात १९ टक्के, तर नवी मुंबईत १७ टक्के अपघात वाढले. मीरा-भाईंदर आणि वसई-विरार परिसरात अपघाताची संख्या गेल्या वर्षीच्या ३८१ वरून ४६० पर्यंत गेली. गडचिरोलीत अपघातांची संख्या १३० वरून १५५ वर वाढली.

नवी मुंबई ३९५ वरून अपघाताची संख्या ४६४ पर्यंत पोहोचली. चालू वर्षातल्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये राज्यभरात एकूण १८ हजार ४५४ रस्ता अपघातांची नोंद झाली. गेल्या वर्षी पहिल्या सहामाहिती ही संख्या १९ हजार २० होती. गेल्या वर्षी झालेल्या अपघाती मृत्य़ूच्या संख्येत ८ हजार ५५७ वरून ८ हजार १०९ पर्यंत घट नोंदवली गेली तरी जखमींची संख्या मात्रा १६ हजार ८४७ च्या तुलनेत चालू वर्षी १६ हजार ८६४ पर्यंत वाढली.

सर्वाधिक अपघाती मृत्यू अमरावतीत

चालू वर्षातल्या सहा महिन्यांमध्ये अपघाती मृत्यू आणि जखमींच्या प्रमाणात झालेली वाढ थरकाप उडवणारी आहे. अमरावती शहरात अपघात संख्या ३ टक्के वाढली असली, तरी तिथल्या मृत्यूच्या प्रमाणात २९ टक्के वाढ झाली आहे. गोंदियात २१ टक्के आणि ठाणे ग्रामीण व रायगडमध्ये १९ टक्के अपघाती मृत्यू वाढले. गडचिरोलीत १२० अपघातांमध्ये जखमींची संख्या १०८ वरून २३८ पर्यंत गेली. पालघरमध्ये जखमींची संख्या ६२ टक्के तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात ४६ आणि वाशिममध्ये ४२ टक्क्यांची वाढली.

यवतमाळ जिल्ह्यात घटले अपघात आणि मृत्यू

राज्यातील काही जिल्ह्यांनी अपघातांवर नियंत्रण मिळवता आले आहे. यात यवतमाळमध्ये अपघात संख्या ४६७ वरून ३६७ घसरली. ही घट सर्वाधिक २१ टक्के आहे. येथील अपघाती मृत्यूचे प्रमाणही २० टक्क्यांनी कमी झाले. नागपूर ग्रामीणमध्ये अपघात संख्या ५३० वरून ४३४ ने कमी झाली. ही घट १८ टक्के नोंदवली गेली. अहिल्यानगरमधील अपघाताचे प्रमाण १०९० वरून कमी होऊन ९०५ वर आले.

काही जिल्ह्यांत रस्ता अपघातांच्या प्रमाणात वाढ निश्चितच चिंताजनक आहे. तेथील भौगोलिक परिस्थिती तुलनेत वेगळी आहे. गडचिरोली, गोंदिया, वर्धेत अपघाती संख्या वाढली आहे. अपघाती मृत्यूला आवर घालणे हे प्राधान्य ठेवून काम केले जात आहे. लोहित मतानी, महामार्ग पोलीस अधिक्षक, नागपूर परिक्षेत्र