अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २६ एप्रिल रोजी राज्यभरातील ७ हजार ७९३ परीक्षा केंद्रांवर होणार असून इयत्ता चौथी आणि सातवीच्या मिळून एकूण ११ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. ही परीक्षा भर उन्हात दुपारी ११ ते १२.३० आणि दुपारी २ ते ३.३० या वेळेत घेण्याचे नियोजन आहे. राज्यातील उष्णतेच्या लाटेचा विचार करता, ही परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.
शिक्षक समितीचे म्हणणे काय?
इयत्ता चौथी व इयत्ता सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सध्या राज्यामध्ये उन्हाचा प्रखर तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अनेक शाळांमध्ये पुरेशी पंख्यांची तसेच थंड पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत दुपारच्या वेळेत परीक्षा देताना विद्यार्थ्यांवर उष्णतेचा, उष्माघाताचा विपरीत परिणाम होऊन त्यांची एकाग्रता ढासळण्याची शक्यता आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, म्हणून ही परीक्षा त्याच दिवशी घेण्यात यावी, मात्र तिचे वेळापत्रक सकाळच्या वेळेत ठेवण्यात यावे. पहिला पेपर सकाळी ८.३० ते १० आणि दुसरा पेपर सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत घेण्यात यावा, अशी विनंती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या आयुक्तांकडे केली आहे. अशी माहिती शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली आहे.
परीक्षा कशासाठी?
राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येते. पूर्वी ही परीक्षा चौथी आणि सातवी या इयत्तांसाठी घेतली जात होती. मात्र, शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदी लक्षात घेऊन २०१६-१७ पासून ही परीक्षा पाचवी आणि आठवी या वर्गांसाठी लागू करण्यात आली.
परीक्षेच्या वेळेत बदल करण्याची मागणी
राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारी घेण्यात आली. तर चौथी आणि सातवीची परीक्षा २६ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार सकाळी अकरा ते बारा या वेळेत प्रथम भाषा व गणित या विषयाची, तर दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची परीक्षा घेण्यात येणार आहे. उन्हाचा तडाखा सुरू असल्याने परीक्षेच्या वेळेत बदल करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.
