नागपूर : शासनाने राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या स्थापनेसाठी लागू असलेल्या नियमांमध्ये काही बदल केले असून त्यानुसार शाळांसाठी आवश्यक जमिनीचे क्षेत्रफळ, इमारतीचे वय, बांधकामाची कागदपत्रे आणि पायाभूत सुविधांच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि नव्या सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे शाळा सुरू करण्यासाठी २० वर्षाची लीज (जमीन करार) आवश्यक करण्यात आला आहे. पूर्वी ती ३० वर्षांची होती.

राज्यात शासकीय व अनुदानित शाळा बंद पडत असताना दुसरीकडे शासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांंमध्ये वाढ होत आहे. आता महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ काही सुधारणा करण्यात आल्या. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल यांनी याबाबतची अधिसूचना काढली आहे. त्यानुसार जमिनीच्या उपलब्धतेपासून इमारतीच्या सुरक्षिततेपर्यंत आणि विद्यार्थ्यांसाठीच्या मूलभूत सुविधांपर्यंत विविध बाबींचे निकष नव्याने निश्चित करण्यात आले आहेत. परिणामी, शाळा सुरू करू इच्छिणाऱ्या संस्थांना सुधारित नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे आणि सुविधांची पूर्तता करावी लागणार आहे.

नव्या नियमांनुसार बहुमजली इमारतीमध्ये प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी जमिनीच्या क्षेत्रफळाबाबत शासनाला सवलत देता येणार आहे. मात्र, अशा शाळांसाठी किमान १,००० चौरस मीटर चटई क्षेत्रफळ आणि स्वतंत्र प्रवेशमार्ग उपलब्ध असणे आवश्यक आहे. नव्या नियमांनुसार ‘अ ’ आणि ‘ब’ वर्गाच्या महापालिका क्षेत्रांमध्ये स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी किमान ५०० चौरस मीटर जमीन आवश्यक आहे. तर इतर महापालिका आणि ‘अ’ वर्गाच्या नगरपालिका क्षेत्रांत १,६०० चौरस मीटर, तर ‘ब’ व ‘क’ वर्ग नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रांत २,४०० चौरस मीटर जमिनीची अट निश्चित करण्यात आली आहे. इमारत किमान पुढील १० वर्षे वापरण्यास योग्य असल्याचे या प्रमाणपत्रातही आवश्यक आहे.

पूर्वी शाळा सुरू करण्यासाठी जमिनीची लीज किमान ३० वर्षांची असणे आवश्यक होते. परंतु आता नव्या नियमानुसार यात १० वर्षांची सवलत देऊन ती २० वर्षांची करण्यात आली आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे

शाळांमधील स्वच्छतागृहांच्या सुविधांबाबतही काही बदल करण्यात आले आहेत. मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांसोबतच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वर्गखोलीच्या आकाराबाबतची विशिष्ट अट वगळण्यात आली आहे.

सीसीटीव्ही, रॅम्प, डिजिटल ग्रंथालय

नव्या तरतुदीनुसार शाळांमध्ये रॅम्प, सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेशा प्रमाणात अग्निशमन यंत्रे, पिंक रूम आणि डिजिटल ग्रंथालय यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुलभ प्रवेश आणि आधुनिक शैक्षणिक सुविधांवर भर देण्यात आला आहे.