नागपूर : भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी हाती घेतलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये (एसआयआर) नाव, पत्ता, वय यात तफावत असलेल्यांसह २००२ मधील यादीत नाव नसलेल्या मतदारांची सुनावणी घेण्यात येणार असून यासाठी त्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) नोटीस पाठवण्यात येणार आहे.

ही नोटीस बीएलओ व्हॉट्सॲपसह प्रत्यक्ष घरी येऊन देतील. त्याचप्रमाणे मतदारांकडून देण्यात येणाऱ्या कागदपत्रांची संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्यात येईल.

३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी

३० जूनला ही मोहीम सुरू करण्यात आली होती. दोनदा मुदतवाढ दिल्यानंतर एसआयआरअंतर्गत प्रत्यक्ष घरोघरी येऊन मतदार नोंदणी अर्ज देऊन तो परत घेण्याची प्रक्रिया १७ ऑगस्टला संपली. जिल्ह्यात ४६ लाख ३८ हजार ५८९ मतदारांची नावे यादीत होती. या सर्व मतदरांच्या घरी बीएलओंनी भेटी दिल्यात. यातील ३१ लाख ९५ हजार १४४ मतदारांची अर्ज संगणीकृत करण्यात आली. तर १४ लाख ४३ हजार ४४५न मतदार मिळालीच नाही यातील काही मतदार गैरहजर मिळाली, काहींचे नाव दोनदा होते तर काही मृत आहेत.काही जण कायमचे स्थलांतरित झाले आहेत. आता ३१ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर सूचना व आक्षेप मागवण्यात येतील.

सत्यता पडताळणी

एसआयआरमध्ये २००२ मधील तपशील न देणारे आणि ज्या मतदारांच्या नावात, पत्त्यात, वयात किंवा इतर दुरुस्ती आहे, अशा सरासरी ८ लाखांवर ७६ हजारांवर मतदारांना बीएलओंमार्फतच नोटीस पाठवण्यात येणार आहे. संबंधित मतदारांना आवश्यक कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करावे लागतील. मतदारांची सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेण्यात येईल. मतदारांनी दिलेले कागदपत्र स्कॅन केल्यानंतर संबंधित सक्षम प्राधिकारणाकडून त्याची सत्यता पडताळण्यात येईल. त्यांच्याकडून आलेल्या प्रतिसादानंतर मतदाराबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

प्रत्येक विधानसभा मतदार संघात सुनावणी

प्रत्येक मतदार संघात सुनावणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बीएलओंकडून देण्याऱ्या नोटीसमध्ये सुनावणीबाबतची माहिती नमूद असणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. संबंधित सर्व मतदारांची वेळेत सुनावणी पूर्ण करण्यासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार प्रशासनाचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली.