Maharashtra SSC Result 2026: अमरावती: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. एकूण ३५ विषयांपैकी १२ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. १०० टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्याही वाढताना दिसत आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी वाढत आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर प्रथम भाषा म्हणून मराठी भाषेची निवड करून परीक्षा देणाऱ्या राज्यातील सुमारे १० लाख ८७ हजार ६९९ विद्यार्थ्यांपैकी ८० हजार ८०३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे धक्कादायक चित्र आहे.

द्वितीय आणि तृतीय भाषेतही तेच..

इयत्ता दहावीत द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठी भाषेची निवड करून एकूण ४ लाख १३ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी १३ हजार ७४१ विद्यार्थी नापास झाले आहेत. ज्या राज्याची राजभाषा मराठी आहे, ज्या भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे, अशा मराठी भाषेतच राज्यातील सुमारे ९४ हजार ५४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. एकीकडे परकीय भाषा निवडणाऱ्या विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण चांगले असताना मराठी विषयाची अनास्था या निमित्ताने उघड झाली आहे.

गुजराती भाषेचा निकाल १०० टक्के

दहावीच्या परीक्षेत द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून गुजराती भाषेची निवड करणाऱ्या ३०२ विद्यार्थ्यांपैकी सर्व म्हणजे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. संस्कृत ही द्वितीय आणि तृतीय भाषा निवडणाऱ्या ९६ हजार ३३१ विद्यार्थ्यांपैकी ९५ हजार ५७१ म्हणजे ९९.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अरेबिक भाषा विषयाचा निकाल ९९.५९ टक्के लागला आहे.

मराठी भाषा विषयाचा निकाल

प्रथम भाषा म्हणून मराठी भाषा विषयाचा निकाल ९२.५७ टक्के लागला आहे. जवळपास आठ टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. मराठी हीच मातृभाषा असलेले विद्यार्थी हे मराठी विषयात अनुत्तीर्ण होत आहेत. याचा अर्थ भाषिक कौशल्य या विद्यार्थ्यांना प्राप्त असण्याची शक्यता नाही. त्यामुळे मराठी विषयाच्या अध्यापन प्रक्रियेचा विचार करण्याची गरज शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

शासनाचे मराठीकडे दुर्लक्ष

मराठी विषय दहावी पर्यंत अनिवार्य असलेल्या कायद्यात सुधारणा करून तो बारावी पर्यंत अनिवार्य असेल अशी संबंधित कायद्यात दुरुस्ती करणे हे शासनाने मान्य केलेल्या मराठी भाषा धोरणात नमूद असूनही अद्याप ती दुरुस्ती करण्यात आलेली नाही, अशी खंत मराठीच्या व्यापक हितासाठी या चळवळीचे संयोजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली आहे.