अमरावती : महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. वन्यजीव मंडळात एकूण ३१ सदस्य असून त्यात संपूर्ण महाराष्ट्रातून तीन आमदारांचा समावेश आहे. त्यात उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, समीर मेघे आणि किर्तीकुमार भांगडिया यांना स्थान मिळाले आहे. हे तीनही आमदार विदर्भाचे प्रतिनिधीत्व करतात. राज्य वन्यजीव मंडळ राज्य स्तरावर वन्यजीवांचे संवर्धन आणि संरक्षण व्यवस्थापन करते. राज्याचे मुख्यमंत्री हे मंडळाचे अध्यक्ष असून वन मंत्री हे उपाध्यक्ष आहेत.
राज्य वन्यजीव मंडळाची रचना
वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ६ च्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे पुनर्गठन करण्यात आले होते. ४ सप्टेंबरच्या शासन निर्णयान्वये या मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. राज्य वन्यजीव मंडळात राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार समीर मेघे, आमदार किर्तीकुमार भांगडिया यांना सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे. याशिवाय किशोर धारिया (वनराई), नेहा पंचमीया (पुणे), रमण कुलकर्णी (कोल्हापूर), अनुज खरे (पुणे), किरण शेलार (मुंबई), प्रवीण परदेशी (मुंबई), स्वानंद सोनी (नागपूर), श्रीकांत टेकाडे (नागपूर), चैत्राम पवार (धुळे), ॲड सुरेखा थेटले (पालघर) हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
अधिकाऱ्यांनाही स्थान
अपर मुख्य सचिव (वन विभाग), सचिव (आदिवासी विकास विभाग), प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), व्यवस्थापकीय संचालक (महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ) सैन्यदलाचे प्रतिनिधी, पशुसंवर्धन आयुक्त, मत्स्यविकास विभाग आयुक्त यांना सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे. याशिवाय पोलीस विभागातील महानिरीक्षक या पदाहून कमी दर्जाच्या पदावर नसलेला अधिकारी, केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालयाील संचालक, वन्यजीव यांचे प्रतिनिधी, भारतीय वन्यजीव संस्थान, डेहराडून, झूलॉजिकल सर्व्हे, बॉटेनिकल सर्वे ऑफ इंडिया यांचे प्रतिनिधी सदस्य राहणार आहेत. मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
स्वयंसेवी संस्थांचेही प्रतिनिधी
राज्य वन्यजीव मंडळात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे प्रतिनिधी, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट यांचे प्रतिनिधी, टायगर रिसर्च अँड कॉन्झर्वेशन ट्रस्ट यांचे प्रतिनिधी यांना सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. ही समिती सर्वसमावेशक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण आणि पथदर्शी धोरणात्मक निर्णय घेणे सुरूच ठेवेल, अशी प्रतिक्रिया ‘बीएनएचएस’चे संचालक किशोर रिठे यांनी व्यक्त केली आहे.
