वर्धा : बऱ्याच काळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती ठप्प होती. मात्र मग शासनाने पवित्र पोर्टल ही प्रक्रिया सूरू करीत भरती सूरू केली. त्यात व्यवस्थापन पातळीवर काही निकष ठेवण्यात आले. त्यांना संस्थेतील पद भरतीची जाहिरात द्यायची आहे.
मुदतवाढ
राज्यातील शिक्षक पदभरती प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि जास्तीत जास्त संस्थांना यामध्ये सामावून घेण्यासाठी शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पवित्र पोर्टलवर शिक्षकांच्या रिक्त पदांची जाहिरात नोंदवण्यासाठी आणि बिंदुनामावली (Roster) तपासणी पूर्ण करण्यासाठी आता १५ जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी तसे निर्देश दिलेत.
वारंवार सूचना देऊनही व्यवस्थापनांची दिरंगाई दिसून आली होती.
राज्यामध्ये शिक्षक पदभरतीची संपूर्ण प्रक्रिया ‘पवित्र प्रणाली’ (Pavitra Portal) मार्फत राबवली जात आहे. सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदे विचारात घेऊन ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५’ (TAIT) च्या आधारे ही भरती केली जात आहे.
सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या शाळांमधील रिक्त पदांची नोंद करण्यासाठी यापूर्वी १ मे २०२६ ते ३१ मे २०२६ हा कालावधी देण्यात आला होता. तसेच बिंदुनामावलीची माहिती तयार ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तालयाकडून यापूर्वी १७ ऑक्टोबर २०२५, २६ मार्च २०२६ आणि ८ मे २०२६ रोजी सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या. असे असूनही, बहुतांश शैक्षणिक व्यवस्थापनांकडून अद्यापही बिंदुनामावली तपासणी अपूर्ण राहिल्यामुळे पवित्र पोर्टलवर जाहिरातींची नोंदणी झालेली नाही, ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आली आहे.
कालबद्ध मर्यादा
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर निर्णय
नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शिक्षक भरतीची ही कार्यवाही वेळेत आणि कालबद्ध मर्यादेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. जर शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त राहिली, तर त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीवर होऊ शकतो. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जास्तीत जास्त व्यवस्थापनांची बिंदुनामावली तपासणी व्हावी आणि त्यांनी पोर्टलवर जाहिरात नोंदवावी, यासाठी प्रशासनाने १५ जून २०२६ पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. मागासवर्ग कक्षाला गतिमान करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी नाशिकच्या विभागीय आयुक्तांना विनंती केली आहे की, त्यांनी आपल्या स्तरावरून नाशिक विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या बिंदुनामावली तपासणीची कार्यवाही वेळेत पूर्ण करून घ्यावी. यासाठी त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सहायक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) यांना तात्काळ आणि कडक सूचना देण्यात याव्यात, जेणेकरून १५ जून २०२६ पूर्वी हे काम शंभर टक्के पूर्ण होऊ शकेल.
थोडक्यात महत्त्वाचे
नवीन अंतिम मुदत १५ जून २०२६ अशी आहे. अनेक शाळा आणि संस्थांची बिंदुनामावली तपासणी अद्याप अपूर्ण राहली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू होण्यापूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करायची आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२५ च्या गुणांवर आधारित भरती होणार. असे स्पष्ट करण्यात आले आहे.
