वर्धा : खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना रिक्त जागा भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची आजचा दिवस अखेरचा होता. पण या कालावधीत बहुतांश शाळांना आपली संच मान्यता झाली नसल्याने अडचण उद्भवली. त्यामुळे चिंतेचा सूर उमटू लागला होता. त्याची नोंद लोकसत्ता ऑनलाईन द्वारे घेण्यात आली होती. मुख्याध्यापक संघटनेने आपली भावना त्यातून व्यक्त केली. अखेर शासनाने दखल घेतलीच. या बद्दल मुख्याध्यापक संघटनेचे नेते सतीश जगताप यांनी आनंद व्यक्त केला आहे.

अशी राहणार मुदत

राज्यातील शिक्षक आणि शिक्षणसेवक पदभरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आणि शैक्षणिक व्यवस्थापनांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ‘पवित्र प्रणाली’मार्फत (Pavitra Portal) शिक्षक पदभरतीची जाहिरात नोंदवण्याच्या प्रक्रियेला आता ३० जून २०२६  पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत पत्र आज, १५ जून २०२६ रोजी जारी करण्यात आले आहे. माहितीनुसार, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक आणि शिक्षक पदभरतीची जाहिरात नोंदवण्यासाठी शाळा व्यवस्थापनांना १ मे २०२६  पासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, अनेक शैक्षणिक व्यवस्थापनांना जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अजून काही कालावधीची आवश्यकता होती. व्यवस्थापनांची ही गरज लक्षात घेऊन प्रशासनाने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्याची मुदत ३० जून २०२६ अखेरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

रिक्त पदे भरण्याचे आवाहन

शासनाने राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या अधीनस्थ असलेल्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. यासाठी व्यवस्थापनांनी https://tait2025.mahateacherercreuitment.org.in/ या अधिकृत संकेतस्थळाला  भेट देऊन आपली जाहिरात नोंदवायची आहे.

अडचणींसाठी ईमेल हेल्पलाइन

जाहिरात नोंदवताना किंवा पदभरतीची प्रक्रिया पार पाडताना शैक्षणिक व्यवस्थापनांना काही तांत्रिक किंवा इतर अडचणी आल्यास, त्यांच्या मदतीसाठी एक विशेष ईमेल आयडी जारी करण्यात आला आहे. व्यवस्थापन आपल्या समस्या edupavitra25@gmail.com या ईमेलवर पाठवून संपर्क साधू शकतात. या मुदतवाढीमुळे शाळांना रिक्त पदांचा अचूक तपशील अपलोड करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार असून, यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. मुदती संपण्यापूर्वी सर्व व्यवस्थापनांनी आपली नोंदणी पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने या बद्दल शासनाचे आभार मानले.