वर्धा : महाराष्ट्र राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रानुसार, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित महागाई भत्त्याची (DA) थकबाकी मार्च २०२६ च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
थकबाकीचा मोठा टप्पा ‘मार्च’मध्ये पूर्ण होणार आहे.शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, १ जुलै २०२५ पासून महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली होती. या सुधारित दरानुसार, जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या चार महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी (Arrears) प्रलंबित होती. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्राद्वारे ही माहिती पुढे आली.
रोखीने जमा
ही सर्व थकबाकी आता मार्च २०२६ च्या पगारात रोखीने जमा करण्याचे निर्देश सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.फेब्रुवारीच्या फरकाचाही मार्ग मोकळा झाला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी २०२६ चे वेतन शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वीच कोषागारात पारित झाले होते, अशा ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विशेष तरतूद करण्यात आली आहे. अशा जिल्ह्यांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारी २०२६ चा एक महिन्याचा महागाई भत्ता फरक देखील मार्च २०२६ च्या वेतनासोबतच रोखीने दिला जाणार आहे.
शालार्थ प्रणाली बदल
यासाठी सुविधा म्हणून ‘शालार्थ’ प्रणालीत होणार आहे.थकबाकीच्या वितरणात कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी महा-आयटी विभागालाही सूचना देण्यात आल्या आहेत. वाढीव महागाई भत्ता आणि थकबाकीच्या देयकांसाठी ‘शालार्थ’ (Shalarth) प्रणालीमध्ये स्वतंत्र टॅब उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी टॅबमध्ये आवश्यक मर्यादा (Validation) लागू करण्यास सांगण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांना दिलासा
ही बाब कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणारी ठरणार.आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात हा निर्णय आल्यामुळे राज्यातील लाखो शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. महागाईच्या काळात थकबाकीची रक्कम रोखीने मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या खिशात मोठी रक्कम जमा होणार आहे. यामुळे शैक्षणिक वर्तुळातून सरकार आणि शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.
