नागपूर : राज्यात थंडीची तीव्र लाट सक्रिय नसली, तरी गारठा आणि तापमानातील चढ-उतार कायम असल्याचे चित्र आहे. मराठवाडा, कोकण, विदर्भासह मुंबईतही हवामान अस्थिर राहिल्याचे जाणवत असून, वाऱ्यांच्या बदलत्या दिशेमुळे हिवाळा आता निरोप घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, जानेवारी महिन्यातच पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गाचे लक्ष हवामानाकडे लागून राहिले आहे.

राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये दुपारच्या वेळेस आर्द्रतेत वाढ होत असून उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. पुढील २४ तासांत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर तसेच संपूर्ण कोकण पट्ट्यात आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. घाटमाथ्यावर पहाटे व संध्याकाळी धुक्याची चादर पसरलेली दिसण्याची शक्यता असून, या भागातील कमाल तापमान सरासरी ३२ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. किमान तापमान मात्र १५ अंशांच्या खाली जाण्याची शक्यता नसल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

अधिक परिणाम कुणावर

ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक परिणाम उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात जाणवणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे परिसरात ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी हलक्या पावसाचीही नोंद होऊ शकते. अचानक पडणाऱ्या पावसामुळे उष्णतेत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात मात्र ढगाळ वातावरण, सकाळ-संध्याकाळ हलका गारठा आणि दुपारी उष्णता असे मिश्र स्वरूपाचे हवामान राहील.

जानेवारीत पाऊस..

हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून ताशी २५ ते ३० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दमट वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसांत हवामानात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता असली, तरी राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज कायम असल्याचं सांगण्यात येत आहे.

देशभरात पश्चिमी झंझावात सक्रिय

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत एक नवा पश्चिमी झंझावात सक्रिय होणार असून, तो पश्चिमेकडील भागातून पुढे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये जोरदार हिमवर्षाव, तर मैदानी भागांमध्ये पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आहे. २८ जानेवारीनंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, त्यानंतर थंडीचा परतीचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.