अकोला : राज्य परीक्षा परिषदेद्वारे घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा बंगाली, कन्नड, तेलगु, गुजराथी व सिंधी माध्यमातून देखील घेतली जाणार आहे. मात्र, या माध्यमातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या तुलनेत कमी असल्यााने त्यांच्यासाठी विशेष परीक्षा केंद्र राहणार आहेत. भाषेनिहाय एक किंवा दोन जिल्ह्यात उमेदवारांच्या परीक्षेचे नियोजन केले आहे.
उमेदवारांसाठी विशिष्ट जिल्ह्यातच परीक्षा केंद्र
पुणे येथील राज्य परीक्षा परिषदेद्वारे शासन निर्णय २३ ऑगस्ट २०१३ अन्वये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२६ राज्यामध्ये २८ जून रोजी घेतली जाणार आहे. ही परीक्षा राज्यातील शिक्षक पात्रता निश्चित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ही परीक्षा कठीण मानली जाते. विविध भाषेतून ही परीक्षा घेतली जाणार आहे. बंगाली, कन्नड, तेलगु, गुजराथी व सिंधी माध्यमातून उमेदवारांना ही परीक्षा देता येईल. या माध्यमातील उमेदवारांची राज्यातील संख्या तुलनेने कमी असल्याने संबंधित उमेदवारांसाठी विशेष परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या माध्यमांच्या उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्येच परीक्षा केंद्रे निश्चित केली जाणार असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पाचही भाषेचे एकूण १७०१ उमेदवार
पाचही भाषेचे माध्यमे मिळून एकूण उमेदवारांची संख्या एक हजार ७०१ आहे. त्यामध्ये बंगाली माध्यमातील उमेदवारांची संख्या २०४ असून विदर्भातील उमेदवारांसाठी चंद्रपूर, तर उर्वरित महाराष्ट्रासाठी ठाणे येथे केंद्र राहील. कन्नड भाषेच्या एक हजार २९४ उमेदवारांसाठी ठाणे, सोलापूर व सांगली जिल्ह्यात केंद्र राहणार आहे. तेलगु माध्यमातील ४४ उमेदवारांसाठी पुणे व नागपूर येथे परीक्षा होईल. गुजराथी माध्यमातील १५० उमेदवारांसाठी ठाणे व नंदुरबार, तर सिंधी माध्यमातील नऊ विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे परीक्षा केंद्र राहील. उमेदवारांची कमी संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे, असे परिषदेकडून सांगण्यात आले.
उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन परीक्षा केंद्रांचा निर्णय
बंगाली, कन्नड, तेलगु, गुजराथी व सिंधी माध्यमातील संबंधित सर्व विद्यार्थी व उमेदवारांनी माध्यमासाठी निश्चित करण्यात आलेल्या जिल्ह्यांची माहिती तपासून आवश्यक ती नोंद घ्यावी. उमेदवारांची संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी दिली.
