अमरावती : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रद्द होऊन चार महिने उलटले असतानाही फेरपरीक्षेच्या आयोजनाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सेवेत असलेले शिक्षक तसेच शिक्षक होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यास शासनाकडून विलंब होत असल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा झाली होती. तेव्हापासून परीक्षेला मुहूर्त सापडलेला नाही. परीक्षेची एक संधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने टीईटी देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांच्या नोकरीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच, सप्टेंबर २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सेवेत असलेल्या शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे. पदोन्नतीसाठीही टीईटी उत्तीर्ण होण्याची अट लागू असल्याने या परीक्षेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिक्षकांसमोर परीक्षेचे आव्हान

शिक्षकांच्या अनेक अडचणी आहेत. सेवेत असलेल्या अनेक शिक्षकांची पाच वर्षांपेक्षा अधिक सेवा शिल्लक आहे. अशा शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण होण्याची आवश्यकता असल्याने त्यांच्यासमोर परीक्षेचे आव्हान आहे. दुसरीकडे, शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांनाही परीक्षेच्या पुढील तारखेची प्रतीक्षा आहे. त्यामुळे फेरपरीक्षेबाबत अनिश्चितता कायम राहिल्यास शिक्षक भरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाकडून स्पष्टतेची मागणी

टीईटी परीक्षेच्या आयोजनाबाबत शासनाने तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शिक्षकवर्गातून होत आहे. परीक्षेची संभाव्य तारीख, पुढील वेळापत्रक आणि न्यायालयाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत स्पष्टता मिळाल्यास शिक्षक व उमेदवारांना नियोजन करणे शक्य होईल. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन फेरपरीक्षेबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आरटीई कायद्यात दुरुस्तीची मागणी

महाराष्ट्रात आरटीई कायदा ज्या वर्षापासून लागू झाला. त्या वर्षापासून टीईटीची सक्ती योग्य आहे. तरी केंद्र शासनाने आरटीई कायद्यात दुरुस्ती करुन पूर्वीच्या सर्व शिक्षकांना टीईटी मधून सूट द्यावी, नोकरीत संरक्षण व पदोन्नती द्यावी, पदोन्नतीला टीईटीची अट नसावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे केली असल्याचे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी सांगितले.