नागपूर : महाराष्ट्रातील जंगलांमध्ये वाघांची संख्या वाढल्याचे संकेत २०२६च्या अखिल भारतीय व्याघ्रगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांतून मिळाले आहेत. वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, राज्यातील वाघांची संख्या ६०० ते ६२५ दरम्यान पोहोचली आहे. अंतिम अहवाल जुलै २०२७ मध्ये प्रसिद्ध होणार असला, तरी या प्राथमिक आकडेवारीमुळे महाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धनाला बळ मिळाल्याचे चित्र आहे.

२०२२च्या अखिल भारतीय व्याघ्रगणनेत महाराष्ट्रात ४४४ वाघांची नोंद झाली होती. त्यानंतर चार वर्षांत अनेक व्याघ्रप्रकल्प आणि वनक्षेत्रांमध्ये वाघांची संख्या वाढल्याचे यंदाच्या गणनेत दिसून आले. विशेषत: मेळघाट, गडचिरोली, ब्रह्मपुरी, उमरेड-कर्‍हांडला आणि नवेगाव-नागझिरा या भागांत लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली. मेळघाट व्याघ्रप्रकल्पात २०२२ मध्ये सुमारे ५० ते ६० वाघ होते. यंदा ही संख्या ९० ते १०० पर्यंत पोहोचल्याचा अंदाज अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वाघांची संख्या २२-२३ वरून सुमारे ४० झाली आहे. ब्रह्मपुरी वनक्षेत्रात सुमारे ७० वाघ, तर नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात २० ते २५ वाघांची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्प, उमरेड-कर्‍हांडला अभयारण्य तसेच प्रादेशिक वन आणि वनविकास महामंडळाच्या क्षेत्रात मिळून जवळपास ५० वाघ असल्याचा अंदाज आहे. उमरेड-कर्‍हांडला परिसरात २०२२मध्ये केवळ सहा वाघांची नोंद होती, यंदा ही संख्या १७ ते १८ पर्यंत वाढली आहे. पेंच व्याघ्रप्रकल्पातील वाघांची संख्या मात्र ४० ते ४५ या पातळीवर स्थिर असल्याचे दिसते. बोर व्याघ्रप्रकल्पात आठ ते दहा, तर भंडारा-गोंदिया जिल्ह्यांत मिळून सुमारे १५ वाघांची नोंद झाली.

पश्चिम महाराष्ट्रातही सकारात्मक चित्र आहे. अनेक वर्षे वाघांचा प्रभावी वावर नसलेल्या सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात आता हालचाली वाढल्या आहेत. राधानगरी-सह्याद्री पट्ट्यात नऊ, तर काली-कोल्हापूर परिसरात १५ वाघ आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा-टीपेश्वर परिसरात सुमारे ३५, तर मुक्ताई-भवानी परिसरात पाच ते सहा वाघ असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

ताडोबातील संख्या स्थिर, मेळघाटची मोठी झेप

राज्यातील सर्वाधिक प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली नसून ती सुमारे १००च्या आसपास स्थिर असल्याचा अंदाज आहे. २०२२च्या व्याघ्रगणनेत या प्रकल्पात ८१ ते ८७ वाघ नोंदविण्यात आले होते. याउलट मेळघाट व्याघ्रप्रकल्पाने सर्वाधिक झेप घेतली असून, वाघांची संख्या जवळपास दुप्पट होऊन ९० ते १०० पर्यंत पोहोचल्याचे प्राथमिक निष्कर्ष दर्शवीत आहेत. त्यामुळे विदर्भातील व्याघ्रसंवर्धनाच्या केंद्रस्थानी आता ताडोबाबरोबरच मेळघाटही ठळकपणे पुढे येत आहे.

वाघांच्या संख्येत वाढ झाली, ही आनंदाची बाब आहे. मात्र, केवळ संख्या वाढवायची आहे, की समतोल साधायचा आहे, हा देखील विचार करावा लागणार आहे. गावातील जनावरे ही संरक्षित क्षेत्राव्यतिरिक्त प्रादेशिक, वनविकास महामंडळाच्या वनक्षेत्रात आढळणार्‍या ७० ते ८० टक्के वाघांचे खाद्य आहेत. भविष्यात संख्या वाढेल, पण त्या दृष्टीने आपली तयारी आहे का, याचाही अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा मानव-वन्यजीव संघर्ष वाढेल. – सावन बाहेकर, अध्यक्ष, सेवा संस्था.