नागपूर : राज्यात या आठवड्यात धुमाकूळ घालणाऱ्या अवकाळी पावसाचा प्रवास आता थांबणार आहे. तरीही आज शनिवारी राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अवकाळी पाऊस परतणार

राज्यावरील वादळी वाऱ्यांसह पावसाचे सावट हळूहळू परतण्याचे संकेत आहेत. मात्र, तरीही आज शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे आजही दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान खात्याने राज्यातील १५ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. यात अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

कमी दाबाचा पट्टा

मध्यप्रदेशपासून तर विदर्भापर्यंत, तसेच मराठवाड्यापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. शुक्रवारी तीन एप्रिलला सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये ओडिशातील जर्मुगुडा येथे देशातील उच्चांकी ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर राजस्थानच्या जैसलमेरमध्ये नीचांकी १६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उकाडा मात्र कायम

पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामान, गारपीट यामुळे राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. मात्र त्याचवेळी किमान तापमानात वाढ झाल्याने रात्री उकाडा कायम आहे. शुक्रवारी, तीन मार्चला वाशीम येथे राज्यातील उच्चांकी ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला येथे ३९.१ अंश, तर सोलापूर आणि अमरावती येथे ३८ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

या जिल्ह्यात पाऊस

शनिवारी चार एप्रिलला मध्य महाराष्ट्रातील जळगाव, अहिल्यानगर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अवकाळीमुळे नुकसान

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात सतत पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे सर्वांनाच नाकीनऊ आलेत. रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. आज सकाळपासूनच अनेक भागात ढगाळ वातावरण बघायला मिळाले. आजही मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पावसा हजेरी लावण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मोठे नुकसान झाले.