नागपूर : मोसमी पावसाची प्रतीक्षा सुरू असतानाच देशभरात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे. उत्तर भारतासह महाराष्ट्र राज्यातील विदर्भात तापमानाचा उच्चांक नोंदवला जात आहे. विदर्भात तापमानाचा पारा ४७ अंश सेल्सिअसपेक्षाही अधिक आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने २८ मे पर्यंत देशातील अनेक राज्यासाठी ‘हिटवेव्ह’ चा इशारा दिला आहे.
रात्रीही उकाड्यापासून सुटका नाही
हवामान खात्याच्या अंदाजानुसार वायव्य, मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागात पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज देण्यात आला आहे. दिवसाच्या तापमानसोबतच रात्रीचे तापमानदेखील जास्त असणार आहे. त्यामुळे रात्रीही उकड्यापासून सुटका नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे मोसमी पावसाने त्याच्या आगमनाची वर्दी दिली असली तरीही उष्णतेचा कहर मात्र कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. आता तर हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यामुळे नागरिकांना आणखी पेचात पाडले आहे.
विदर्भात स्थिती गंभीर
पूर्व उत्तरप्रदेश आणि पूर्व मध्य भारतात २२ ते २८ मे दरम्यान उष्णतेची तीव्र लाट राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली परिसरातही २४ ते २७ मे दरम्यान उकड्याचा जोर कायम राहणार आहे. राजस्थानमध्ये २४ ते २८ मे दरम्यान तापमानात आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषकरून महाराष्ट्रातील विदर्भात उष्णतेची स्थिती आणखी गंभीर बनली आहे. ब्रम्हपुरी तसेच गडचिरोली शहरात तापमान ४७ अंश सेल्सिअस हुन अधिक राहण्याची शक्यता आहे. वर्धा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यात दिवसच नाही तर रात्रीचे तापमान देखील वाढलेले असणार आहे. चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांना ‘येलो’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
या राज्यात उष्णतेची लाट
छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही पुढील आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः रात्री तापमानात घट न झाल्यास शरीराला विश्रांती मिळत नाही आणि उष्माघाताचा धोका वाढतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे बांधकाम कामगार, रस्त्यावर काम करणारे कर्मचारी आणि दाट लोकवस्तीच्या शहरांतील नागरिकांना सर्वाधिक फटका बसत आहे. मे महिन्यात राज्यात उष्माघातामुळे काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
