Vidhan Parishad Election: नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या १६ जागा नागपुरातील पोट निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापले. या निवडणुकीत महायुतीचे परडे जड दिसत असले तरी काही ठिकाणी ती चुरशीची होण्याची शक्यता आहे. परंतु दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची अंतिम यादी अद्याप तयार झाली नसल्याची माहिती आहे.

मतदार कोण असतात?

या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका, पंचायत, जिल्हा परिषदेतील सदस्य तसेच पंचायत समिती सभापती हे मतदार असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षित जागेवर निवडून येणाऱ्या सदस्यांस सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार नगरपालिका, नगर पंचायत व महापालिकेतील आरक्षित जागांवर निवडून आलेल्यांनी प्रमाणपत्रासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केले आहे.

जात पडताळणी समितीकडे अनेक अर्ज प्रलंबित

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नगर पंचायत व नगरपालिका निवडणुकीला या महिन्याच्या शेवटी सहा महिने पूर्ण होतील. तर महापालिकेच्या निवडणुकीला दोन महिन्यांनी सहा महिने पूर्ण होतील. जात पडताळणी समितीकडे अनेक अर्ज प्रलंबित आहेत. काहींच्या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेपही घेण्यात आले आहेत. जातवैधता प्रमाणपत्र न मिळाल्यास किंवा जातीचा दाखला अवैध ठरवल्यास संबंधित सदस्याचे सदस्यत्व रद्द होईल. असे झाल्यास ते मतदारच ठरणार नाही.

…तर कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता

अर्ज प्रलंबित असल्याने सध्यातरी या नगरसेवकांच्या सदस्यात्वाबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. १८ जूनला मतदान असून २२ जूनला मोजणी होणार आहे. या मुदतीपर्यंत जात पडताळणी समितीकडून प्रकरणे निकाली काढणे अवघड असल्याचे बोलल्या जात आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून अर्ज वैध ठरवल्यावरच सदस्यत्व कायम ठरून संबंधित सदस्य मतदानास पात्र ठरतील. अर्ज निकाली निघाले नसल्याने मतदार यादीही अंतिम झाली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. मतदानानंतर जात पडताळणी समितीकडून अर्ज अवैध ठरवल्यास मोठा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.