नागपूर : मतदार याद्यांच्या दुरुस्तीसाठी भारत निवडणूक आयोगाकडूनन विशेष सखोल पुनरीक्षणची (एसआयआर) प्रक्रिया राबवण्यात येत आहे. काही राज्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून आता महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. यापूर्वी ज्या राज्यात ही प्रक्रिया राबवण्यात आली तिथे लाखो मतदारांची नावे कमी करण्यात आली. परिणामी त्यांनी निवडणुकीत मतदानच करता आले नाही. या मोहिमेंतर्गत मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्याला (बीएलओ) प्रत्येक घरी जाऊन मतदारांकडून ‘एन्युमरेशन फॉर्म’ भरून घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सुरू होऊन आज आठ दिवसांवर झाले असून अजून बीएलओ नागरिकांच्या घरी पोहचले नाही. वेळेत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर लाखो लोकांची नावे मतदार यादीतून कमी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बीएलओ त्यांच्या मूळ कामात व्यस्त
एसआयआर मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ दरम्यान बीएलओंना प्रत्येक घरी जाऊन मतदारांकडून ‘एन्युमरेशन फॉर्म’ भरून घेणे आवश्यक आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण ४६ लाख ३८ हजार ५८९ मतदार आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार यापैकी ३२ लाख ४३ हजारांवर मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, उर्वरित मतदारांचे मॅपिंग शिल्लक आहे. एसआयआरच्या कामासाठी ४ हजार ६१० बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. शहरात ही जबाबदारी प्रामुख्याने शिक्षक, कर निरीक्षक, लिपीक, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. बीएलओ म्हणून जबादारी असलेल्या शिक्षकांना शाळा करून हे काम करायचे आहे. तर अंगणवाडी सेविका, आशा वर्कर या आपल्या दैनंदिन कार्यालयीन कार्यात व्यस्त असल्याने अनेक मतदारापर्यंत ते पोहोचू शकलेले नाहीत. एकूणच जिल्ह्यात ही एसआयआरची प्रक्रिया सुरू आहे किंवा नाही, हेच मतदारांना कळायला मार्ग नाही. त्यामुळे आता एसआयआरचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काम न करणाऱ्या बीएलओंची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून मागवण्यात येत आहे. एसआयआरची गती संथ आहे. वेळेत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास लोक मतदार होण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
दूरच्या नियुक्तीने बीएलओ गोंधळात
अनेक बीएलओंना त्यांच्या कार्यरत परिसराऐवजी दूरच्या भागात नियुक्त करण्यात आल्याने संबंधित मतदारांची ओळख आणि परिसराचे मॅपिंग अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक बीएलओंना मतदारांचे पत्ते किंवा परिसराची पुरेशी माहिती नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे घरभेटी, मतदार पडताळणी आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया वेळेत व अचूकपणे पूर्ण होणार का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
कारवाईचा इशारा
बीएलओ म्हणून नियुक्ती असलेल्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, लिपीक आदी जर एसआयआरचे काम करत नसेल, त्यांची यादी मागवली असून, त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाकडून प्रसंगी कारवाई करण्यात येईल, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. रचना इंदूरकर यांनी सांगितले.
