नागपूर : अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. पण आता तेवढ्याच दुपटीने तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट थांबली असली तरी आता खऱ्या अर्थाने उकाडा वाढणार आहे.
हवामान प्रणाली निवळत आहे
महाराष्ट्रात तापमान वाढायला लागले असतानाच अवकाळी पावसाने डोके वर काढले. तीन दिवस राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपीट झाली. या दुहेरी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला. गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वातावरणात थोडा गारवा जाणवत असला तरी आता कमाल तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. अवकाळी पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही, त्यामुळे वातावरणात उकाडा वाढणार आहे. अरबी समुद्रापासून ते उत्तर भारतापर्यंत सक्रिय झालेली हवामान प्रणाली आता हळूहळू विरळ होत आहे.
खासगी हवामान संस्था म्हणते…
अवकाळी पावसाचा जोर ओसरला असला तरीही पाऊस पूर्णपणे संपलेला नाही. विदर्भ आणि मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे सावट अजूनही कायम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेच्या अंदाजानुसार हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील ‘सायक्लोनिक सर्क्युलेशन’ची स्थिती आता बिहारच्या दिशेने पुढे सरकली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होईल.
महाराष्ट्रात उकाडा वाढण्याची शक्यता
कोकण पट्ट्यात कमाल तापमानात वाढ होणार आहे. वातावरण दमट आणि उष्ण राहील. त्यामुळे उकाड्याचा त्रास होऊ शकतो. रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मात्र हवामान खात्याने “यलो अलर्ट” दिला आहे. तर लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाऱ्याचा वेश ताशी ५० किलोमीटरच्या आसपास असेल.
पावसामुळे झालेले नुकसान
पुणे जिल्ह्यातीळ शिरूर तालुक्यासह वाशीम जिल्ह्यात मानोरा, विठोली, कारखेडा तसेच नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागांत व अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील सावरा, आसेगाव बाजार आणि मंचनपूर परिसरात, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याला वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. त्यामुळे बागांमधील फळं तसेच शेतपिकांचे मोठे नुकसान झाले.
