नागपूर : राज्यात थंडीचा प्रभाव कमी झाला आहे आणि ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी २७ जानेवारीला राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर अवकाळी पावसाचे सावट आजदेखील कायम आहे. आजही किनारी भागासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आजही पावसाचा अंदाज

जानेवारीच्या अखेरीस महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल दिसू लागले आहेत. थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होत असून, वाढलेली आर्द्रता, ढगाळ वातावरण आणि काही भागांत अवकाळी पावसामुळे राज्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. २८ जानेवारीला काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम राज्यावर जाणवत आहे.

कोकणात ढगाळ वातावरण

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागांत हवामान ढगाळ ते अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. सकाळच्या वेळेत हलके धुके दिसू शकते. बदलापूर आणि नवी मुंबईच्या काही भागांत २७ जानेवारीला पाऊस पडल्याने आजही ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस, तर किमान २२ ते २४ अंश सेल्सिअस दरम्यान राहील.

पश्चिम महाराष्ट्र मात्र कोरडा

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत सकाळी हलके धुके जाणवू शकतात. मात्र सूर्य वर आल्यानंतर वातावरण स्वच्छ होईल. पावसाची शक्यता कमी असून दिवसभर ऊन पडण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान २६ ते २९ अंश सेल्सिअस, किमान १५ ते २० अंश सेल्सिअस राहील.

मराठवाडा-विदर्भ अस्थिर

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यांत दिवसभर ढगाळ वातावरण राहील. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर परिसरात सकाळी हवामान निवळलेले असले तरी दुपारनंतर ढग वाढण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलका पाऊस किंवा अचानक हवामान बदल जाणवू शकतो. या भागांत कमाल तापमान २८ ते ३२ अंश सेल्सिअस, किमान १५ ते २० अंश सेल्सिअस राहील. विदर्भात मंगळवारी काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला होता. तर आजदेखील पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे.

थंडीचा प्रभाव कमी होणार

एकूणच राज्यात हिवाळ्याचा प्रभाव ओसरत चालला आहे. सकाळी हलका गारवा जाणवेल, मात्र दिवसा ऊन आणि वाढलेली आर्द्रता यामुळे उष्णतेचा त्रास होऊ शकतो. पुढील काही दिवस तापमानात मोठी घसरण अपेक्षित नाही; उलट किमान तापमानात हळूहळू वाढ होत थंडी आणखी कमी होण्याची शक्यता आहे.