नागपूर : राज्यात पुन्हा एकदा कमाल तापमानाचा पारा उंचावला आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यातील बहूतांश भागातील शहरांमध्ये कमाल तापमान ४४ अंशापर्यंत पोहोचले. दरम्यान, हवामान खात्याने पुढील चार दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
तापमानात पुन्हा एकदा वाढ
वादळाच्या स्थितीमुळे राज्यातील बहूतांश भागात गेले काही दिवस पावसाळी वातावरण होते. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा तापमानात वाढ झाली आहे. भारतीय हवामान खात्यानेच पुढील चार दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांना आता तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
सोमवारी राज्यातील बहूतांश भागात तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले गेले. सर्वाधिक तापमानाची नोंद करणाऱ्या अकोला जिल्ह्यात कमाला तापमानाचा पारा ४५ अंशाला टेकला. तर अमरावती येथेही ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव येथेही ४४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
विदर्भासह उत्तर मध्य महाराष्ट्र उष्णतेच्या तडाख्यात
गुजरात आणि राजस्थानमध्ये उष्णतेची लाट असतानाच आता महाराष्ट्रातही ही लाट आली आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात कमाल तापमानाचा पारा झपाट्याने वर जात आहे. राज्यातील वादळाचा प्रभाव आता कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा उष्णतेचा तडाखा वाढताना दिसून येत आहे.
राज्यातील हवामान पुढील काही दिवस कोरडेच राहणार असल्याने या दिवसात उष्णतेची लाट मात्र तीव्र होईल. विदर्भासह उत्तर मध्य महाराष्ट्राला उन्हाचा तडाखा अधिक जाणवणार आहे. सोमवारच्या कमाला तापमानाचा पारा मंगळवारी आणखी वाढलेला दिसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थिती राहणार आहे.
वाढत्या तापमानाची धडकी
राज्यातील हवामान झालेल्या बदलानंतर आता कुठे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला होता. यापूर्वी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान विदर्भात नोंदवले होते. संपूर्ण देशातच अकोला, अमरावती या शहराने तापमानाच्या बाबतीत विक्रम केला होता. ४६ अंश सेल्सिअसपलीकडे तापमान पोहोचले असताना हवामानातील बदलाने गेले काही दिवस दिलासा दिला. मात्र, आता दुपटीने तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील अर्ध्याहून अधिक शहरांमध्ये तापमान ४४ अंशापर्यंत पोहोचले आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर हे तापमान पुन्हा ४६ अंश सेल्सिअस ओलांडण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे.
