नागपूर : राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून विदर्भासह मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आजपासून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आजपासून पावसाच्या सरी कोसळणार आहेत. काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, त्याचवेळी गुरुवार आणि शुक्रवारची रात्र मात्र किमान तापमानात जवळजवळ पाच अंश सेल्सिअसने घट झाली होती. तापमान पुन्हा एकदा १२ ते १४ अंश सेल्सिअसपर्यंत होते. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला असतानाच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा थंडी परतली. वाऱ्याची दिशा अचानक बदलल्याने संपूर्ण विदर्भात थंडी वाढली. उत्तर भारतातून पुन्हा एकदा थंड वारे येत आहेत. त्यामुळे गुरुवारी व शुक्रवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील किमान तापमानाचा पारा सामान्यापेक्षा कमी नोंदवला गेला. गुरुवारी रात्री नागपुरातील किमान तापमान १४.८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. विदर्भात गोंदिया आणि भंडारा सर्वाधिक थंड राहिले. गोंदियाचे किमान तापमान १२.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. वाशीम जिल्ह्यातही तीच स्थिती होती. वाशीमचे किमान तापमान १२.८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. तसेच वर्धा जिल्ह्याचे किमान तापमान १३.५ अंश सेल्सिअस, गडचिरोलीचे १३.४ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूरचे १३.६ अंश सेल्सिअस होते.

हेही वाचा : सीईटीच्या परीक्षा शुल्कात वाढ; विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त, विरोधी पक्षाच्या आमदारांकडून टीका

अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातही थंडीचा फटका बसला. अमरावतीचे किमान तापमानही १४ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. महाराष्ट्रातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका वाढत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ११ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात मध्यम थंडीचा अंदाजसुद्धा आहे. सातत्याने बदलणाऱ्या या वातावरणामुळे शेती, फळबागांवरसुद्धा त्याचा परिणाम हात आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यात होत असून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम हाेत आहे. खोकला, सर्दी यासारखे आजारदेखील बळावले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra weather update chances of heavy rain and thunderstorm in vidarbh marathwada yellow alert rgc 76 css
First published on: 10-02-2024 at 11:26 IST