नागपूर : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. दिवसा गरम तर रात्री थंडी असे वातावरण आहे. त्यामुळे राज्यातून थंडीने जवळजवळ काढता पाय घेतल्याचे आता स्पष्ट होत आहे. कारण दुपारचे उन्हही उन्हाळ्याची चाहूल करुन देणारे आहे.
हवामान खाते आणि हवामान अभ्यासकांकडून यंदा थंडी मार्चच्या मध्यान्हापर्यंत राहणार असे संकेत देण्यात आले होते. मात्र, फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच हा संकेत मोडीत निघाल्याचे दिसून येत आहे. हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल सुरू झाला आहे. केवळ रात्रीच्या सुमारास थंडी आणि दिवसा उन्हाळ्याची चाहूल देणारे उन्ह असे वातावरण सध्या राज्यात आहे.
आता हिमालय क्षेत्रात नव्याने एक पश्चिमी झंझावात सक्रिय होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस उत्तर भारतात तुलनेने थंडीचा कडाका कमी झाला असला तरीही दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणासह उर्वरित राज्यांमध्ये गारठा कायम असेल. तर काही भागांमध्ये पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान मेघगर्जनेसह देशाच्या राजधानीत पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील हवामानात देखील सातत्याने बदल होत आहे.
तापमानवाढीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. राज्यात कमाल तापमानाचा आकडा सरासरी तीस अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे आता उन्हाळ्याच्या पर्वास सुरूवात झाली असून थंडीने राज्याची वेस ओलांडल्याचे स्पष्ट होत आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उष्मा जाणवण्यास सुरूवात झाली असून हवेतील गारठ्याची जागा आता उष्ण वारे घेत असल्याची जाणीव होत आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येसुद्धा हवामानाची ही स्थिती कायम आहे.
येत्या दिवसात उकाडा आणखी वाढेल असा अंदाज आहे. देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर अरबी समुद्रामध्ये सध्या केरळ आणि नजीकच्या किनाऱ्यांपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे निर्माण होत असल्याने केरळपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. ज्यामुळे दक्षिण भारतात पावसाच्या सरींचीसुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशाच्या दक्षिणेसह उत्तरेकडे होणाऱ्या हवामान बदलांचा संमिश्र परिणाम महाराष्ट्रावर दिसून येत आहे.
पुढील २४ तासांमध्ये राज्यातील हवामान अंशत: ढगाळ असेल आणि हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि लडाखसह उत्तराखंडमध्ये अतीव उंचीवर असणाऱ्या भागांमध्ये तूफान हिमवृष्टी सुरू झाली असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हिमाचलमधील चंबा, कुल्लू आणि किन्नौर जिल्ह्यांमध्ये या स्थितीला अनुसरून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आहे. देशातील हवामान बदलांचे हे सत्र आठ फेब्रुवारीपर्यंत कायम राहणार असून झंझावात यास सक्रिय असणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

