विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होत असल्याने टीका सुरू झाली. करोनामुळे लागोपाठ दुसऱ्या वर्षी नागपूरमध्ये अधिवेशन होत नाही. यापूर्वी पाच वेळा वर्षभरात एकही अधिवेशन नागपूरमध्ये झालेले नाही. हे सहावे वर्ष आहे.

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरमध्ये होण्यास कधी सुरुवात झाली?

२८ सप्टेंबर १९५३ मध्ये झालेल्या नागपूर करारात राज्य विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूरमध्ये भरविण्यात येईल, अशी तरतूद होती. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६० मध्ये नोव्हेंबरमध्ये नागपूरमध्ये पहिल्यांदा अधिवेशन झाले होते. त्या अधिवेशनात १४ दिवसांचे कामकाज झाले होते.

नागपूरमध्ये आतापर्यंत किती वेळा अधिवेशन झालेले नाही?

आतापर्यंत पाच वर्षांत एकही अधिवेशन नागपूरमध्ये झालेले नाही. हे सहावे वर्ष. आतापर्यंत १९६२, १९६३, १९७९, १९८५, २०२० या वर्षांत एकही अधिवेशन नागपूरमध्ये झाले नाही. १९६२ व १९६३ मध्ये चीन युद्ध व निवडणुकीमुळे अधिवेशन झाले नव्हते. १९७९ आणि १९८५ मध्ये लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकांमुळे अधिवेशन झाले नव्हते. २०२० मध्ये करोनामुळे नागपूरचे अधिवेशन टाळण्यात आले होते.

वर्षभरात एकापेक्षा अधिक अधिवेशने नागपूरमध्ये किती वेळा झाली?

१९८० मध्ये नागपूरमध्ये जानेवारी आणि  डिसेंबर तसेच १९८६ मध्ये जानेवारी आणि नोव्हेंबरमध्ये दोनदा अधिवेशने झाली आहेत. १९७९ आणि १९८५ मध्ये न झालेल्या अधिवेशनांची भरपाई पुढील वर्षी दोन अधिवेशने नागपूरमध्ये आयोजित करून करण्यात आली होती. २०२० मध्ये करोनामुळे विधिमंडळाची अधिवेशने अल्पकाळासाठी झाली. २०२१ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन दहा दिवसांचे झाले, तर पावसाळी अधिवेशनाची औपचारिकता पार पाडण्यात आली होती. लागोपाठ दोन वर्षे अधिवेशने नागपूरमध्ये झालेली नसल्याने पुढील वर्षी २०२२ मध्ये एकापेक्षा अधिक अधिवेशने नागपूरमध्ये घेण्याची मागणी  केली जात आहे.