नागपूर: महाराष्ट्र आणि देशात अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवण्यात अपयश येत असले तरी त्यांच्यातील अंतर्गत वाद मात्र अद्यापही संपलेला नाही. महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून हा वाद सुरू आहे. माजी अध्यक्ष कुणाल राऊत यांना पदावरून पायउतार करत त्यांच्या ठिकाणी शिवराज मोरे यांना अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर दोघांमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता बेहतर नागपूर नावाच्या उपक्रमाच्या माध्यमातून कुणाल राऊत यांच्या समर्थकांकडून शिवराज मोघे यांच्या विरोधात बंड पुकारण्यात आले आहे. या उपक्रमाच्या पोस्टर मध्ये असलेल्या दीक्षाभूमीवर भगवा ध्वज लावण्यात आल्याने मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी कुणाल राऊत यांच्या समर्थकांनी केली आहे. काय आहे नेमकं प्रकरण पाहूया…
नेमके प्रकरण काय?
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने ‘बेहतर नागपूर’ नावाचा एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांच्या समस्या समजून घेण्यात येणार आहे. यावर चर्चा करून त्या समस्या कशा सोडवता येतील याची चर्चा होणार आहे. यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने एक पोस्टर प्रकाशित करण्यात आले आहे. याची पत्रकार परिषदही घेण्यात आली. या पोस्टरवर दीक्षाभूमीचे चित्र असून दीक्षाभूमीवर भगवा ध्वज फडकवण्यात आल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड रोष असल्याचे कारण देत नागपूर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आशिष बळीराम मंडपे यांनी सावनेर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ॲट्रॉसिटी अंतर्गत या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
तक्रारीत काय आरोप केले आहेत
युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमार्फत पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यामध्ये शिवराज बापूसाहेब मोरे, अजय चिकारा, अनुराग सुरेश भोयर, मिथिलेश दत्ताजी कान्हेरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्या पत्रकार परिषदेमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांनी आंबेडकरी समाज व बहुजन समाजाला वेदना होतील व समाजा समाजात तिढा निर्माण होईल असे आक्षेपार्य पोस्टर / पोम्प्लेट सोबत आणले होते व त्यांनी ते पोस्टर संपूर्ण पत्रकार परिषदेत गर्वाने दाखविले. त्या पोस्टर / पोम्प्लेटमधे नागपूर येथील संपूर्ण भारतातील आंबेडकरी जनतेचे आणि बहुजन समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या दीक्षाभूमी स्तूपाच्या टोकावरती भगवा झेंडा लावल्याचे दाखविले आहे.
पत्रकार परिषदेत उपस्थित स्थानिक पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती आहे की दीक्षाभूमी स्तुपावरती ‘पंचशील ध्वज किंवा निळा ध्वज’ याचाच वापर केला जातो. कारण हे ध्वज आंबेडकरी जनता तसेच बहुजन समाजाचे प्रतीक मानले जाते. याबाबत माहिती असून सुद्धा या पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक समाजात रोष निर्माण होईल व जाती-जातीत भांडणे लागतील या उद्देशाने दीक्षाभूमी वरती भगवा झेंडा लावला. सध्याची परिस्थिती पाहता संपूर्ण देशात जातींच्या मुद्यांवरून मोठ्या प्रमाणात दंगली तसेच भांडणे होताना. आपण बघत असतो त्याच पार्श्वभूमीवर आता ही घडलेली घटना अतिशय निंदनीय व रोष निर्माण करणारी आहे. या घटनेमुळे शिवराज मोरे, अजय चिकारा, अनुराग भोयर, मिथिलेश कान्हेरे व इतर पदाधिकाऱ्यांवरती जातीय दंगे घडवून आणण्याच्या कलमांतर्गत नागपूर येथे गुन्हा दाखल तसेच ॲट्रॉसिटीचा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा तपास सुरू करावा अशी मागणी करण्यात आली.
युवक काँग्रेसकडून दिलगिरी
या घटनेनंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून दिलगीरी व्यक्त करणारे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘आवाज महाराष्ट्राचा -बेहतर नागपूर’ अभियानाच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या एका डिझाईनमध्ये तांत्रिक व डिझाईन प्रक्रियेदरम्यान अनवधानाने झालेल्या चुकीमुळे काही समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याची बाब आमच्या निदर्शनास आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मनापासून दिलगिरी व्यक्त करत असून, कोणाच्याही भावना दुखावण्याचा अथवा कोणत्याही महापुरुष, स्मारक, विचारधारा किंवा समाजाचा अवमान करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. सदर बाब अत्यंत गांभीर्याने घेत संबंधित प्रचार साहित्य तात्काळ मागे घेण्यात आले असून, या त्रुटीस जबाबदार असलेल्या संबंधित तांत्रिक व डिझाईन प्रक्रियेतील व्यक्तींवर योग्य ती अंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ही संविधानिक मूल्ये, सामाजिक समता, बंधुता आणि सर्व समाजघटकांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारी संघटना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, सामाजिक न्यायाची भूमिका आणि देशाच्या संविधानाबद्दल आम्हाला सर्वोच्च आदर आहे. या घटनेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्या सर्व समाजबांधवांची आम्ही पुन्हा एकदा मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्यात अशा प्रकारची घटना घडणार नाही याची काळजी घेतली जाईल, याची हमी देत आहोत.
