नागपुरातील २० शाळांच्या दीडशे विद्यार्थ्यांचा सहभाग

गणराज्य दिनी देशाची राजधानी दिल्लीमध्ये राजपथावर सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे सोंगी मुखवटे नृत्य सादर होणार असून, त्यात नागपूरच्या २० शाळेतील १५० विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे यापूर्वी सादर झालेल्या नृत्याला अनेक पुरस्कार मिळाले. यावर्षी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या उपराजधानीतील शालेय विद्यार्थ्यांचे नृत्य सादर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे नृत्य सादर करणाऱ्या विद्याथ्यार्ंमध्ये उत्साहाचे वातावरण असून ते परिश्रम घेत आहेत.

गेल्या महिन्याभरापासून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात सोंगी मुखवटे नृत्याची तालीम सुरू आहे. त्यासाठी मुंबईतील सुप्रसिद्ध कोरियोग्राफर अरविंद राजपूत आले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या पद्मश्री गीता महलिक, विनोद कुमार, सविता  राणा, अजय चौधरी आणि लक्ष्मीनारायण नागपुरात आले असताना त्यांनी नागपूरच्या सोंगी मुखवटे या नृत्याची निवड केली आहे. शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा या नृत्यामध्ये सहभाग असून, गेल्या महिन्याभरापासून त्यांची तालीम सुरू आहे. अंबादास गवळी यांनी प्रारंभी प्रशिक्षण दिले. याशिवाय नीलेश भोयर, प्रियंका फुलझेले, विवेक नाहतकर, महेंद्र आरेवार आदी विद्यार्थी मेहनत घेत आहेत.

गेल्या सात वर्षांत नागपूरला तीन वेळा पुरस्कार मिळाले असून, यावर्षी पुरस्कार मिळावा त्या दृष्टीने विद्यार्थी मेहनत करीत आहेत. यावर्षी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ राहणार नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. नागपूरच्या विद्याथ्यार्ंचे नृत्य मात्र राजपथावर सादर होणार आहे.

या नृत्याबाबत माहिती देताना अंबादास गवळी यांनी सांगितले, चैत्र पौर्णिमा देवीच्या पूजेच्यावेळी सोंगी मुखवटे हा नृत्य प्रकार ग्रामीण भागात काही आदिवासी जिल्ह्य़ात सादर केला जातो.

साधारणत: होळीनंतर हा नृत्यप्रकार सादर केला जातो. हातामध्ये काठी घेऊन हे नृत्य सादर केले जाते. असत्यावर सत्याचा विजय हा संदेश या नृत्यातून दिला जातो. ढोल, संबल आणि पावरी वाद्याचा यात उपयोग होत आहे.

केंद्राचे संचालक डॉ. पीयूषकुमार म्हणाले, केंद्राच्यावतीने आंध्र आणि महाराष्ट्र यापैकी एका नृत्याची निवड केली जाणार होती. केंद्राचे पथक नागपुरात आले असताना त्यांनी नागपूरच्या नृत्याची निवड केली. शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांचा या नृत्यामध्ये समावेश आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात नृत्याचे हे पथक दिल्लीला रवाना होणार आहे. सुदर्शन पाटील आणि प्रेमस्वरूप तिवारी यांच्याकडे केंद्रातर्फे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गणराज्य दिनाच्या दिवशी सादर होणाऱ्या कार्यक्रमात नागपूरच्या कलावंतांची कलाकृती ही आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे. यापूर्वी नागपूरला अनेक पारितोषिके मिळाली आहे. या नृत्यासाठी सांस्कृतिक केंद्राने स्वतंत्र निधीची तरतूद केली असून, विद्यार्थ्यांना सर्व सोयी केंद्रातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.