वर्धा : मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास पुन्हा एक संधी पुरवणी परीक्षेत दिल्या जाते. त्या परीक्षेबाबत ही सूचना आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे तर्फे एक अत्यंत महत्त्वाची माहिती अधिकृत पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षांचे ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) आजपासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
प्रवेशपत्र इथे मिळणार
मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना या संदर्भातील सूचनांची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे प्रवेशपत्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in सोमवार, दिनांक ०८ जून २०२६ पासून ‘Admit Card’ या लिंक द्वारे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या संदर्भात शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना डाऊनलोड करताना कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास त्यांनी तात्काळ संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
मंडळाच्या महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना
हॉल तिकीट प्रिंट करून देणे बंधनकारक आहे. सर्व विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी इ. १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने प्रिंट करून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचा शिक्का व स्वाक्षरी उमटवून विद्यार्थ्यांना वितरित करायचे आहे. शुल्क आकारणीस सक्त मनाई आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेशपत्र प्रिंट करताना शाळा किंवा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
अर्ज स्टेटस व विविध पर्याय असे. ज्या आवेदनपत्रांना “Paid” असे स्टेटस प्राप्त झाले आहे, त्यांचेच प्रवेशपत्र ‘Paid Status Admit Card’ या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. तसेच, अतिविलंब शुल्क भरून अर्ज केलेल्या व विभागीय मंडळाने एक्स्ट्रा सीट नंबर दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र ‘Extra Seat No Admit Card’ या पर्यायाद्वारे मिळतील. तर ज्यांचे शुल्क उशिरा प्राप्त झाले आहे त्यांचे ‘Late Paid Status Admit Card’ द्वारे उपलब्ध होतील.
दुरूस्तीची प्रक्रिया अशी आहे
डाऊनलोड केलेल्या प्रवेशपत्रामध्ये विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख किंवा इतर काही दुरुस्ती, तसेच विषय किंवा माध्यम बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळाशी प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य ती दुरुस्ती करून घ्यावी. फोटो खराब किंवा अस्पष्ट असल्यास उपाय. प्रवेशपत्रावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा नवीन फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी त्यावर शिक्का मारून स्वाक्षरी करावी. तसेच प्रवेशपत्र गहाळ झाल्यास लाल शाईने ‘द्वितीय प्रत’ (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना पुनर्प्रिंट उपलब्ध करून द्यावी.
जून-जुलै २०२६ च्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी वरील सर्व बाबींची नोंद घ्यावी आणि आपल्या संबंधित शाळा किंवा महाविद्यालयाशी संपर्क साधून आपले अधिकृत हॉल तिकीट वेळेत प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.
