वर्धा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ (MAHATET) २०२६ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य परीक्षा परिषदेने ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता इच्छुक उमेदवारांना २४ एप्रिल २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करता येणार आहेत. तांत्रिक अडचणी आणि उमेदवारांकडून होणारी वाढती मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

आधीची मुदत

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, यापूर्वी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २७ मार्च २०२६ पासून सुरू करण्यात आली होती. या अर्जांसाठी १६ एप्रिल २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, राज्याच्या विविध भागांतील परीक्षार्थी आणि उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून मिळावी, अशी आग्रही विनंती परिषदेकडे केली होती. अनेक उमेदवारांना कागदपत्रांची पूर्तता करताना किंवा संकेतस्थळावरील तांत्रिक बाबींमुळे वेळेत अर्ज भरता आले नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन आयुक्त महेश चोथे यांनी मुदतवाढीचे आदेश निर्गमित केले आहेत.

सुधारित वेळापत्रकानुसार, आता उमेदवारांना १७ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येतील. ही मुदतवाढ म्हणजे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या राज्यातील हजारो तरुणांसाठी शेवटची आणि सुवर्णसंधी मानली जात आहे.

‘हा’ बदल नाही

दरम्यान, अर्जाच्या मुदतीत बदल झाला असला तरी, परीक्षेच्या मुख्य तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही नियोजित वेळापत्रकानुसार रविवार, २१ जून २०२६ रोजीच पार पडणार आहे. शिक्षण विभागाने २०१३ च्या शासन निर्णयानुसार शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा अनिवार्य केली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या परीक्षेसाठी दरवर्षी लाखो उमेदवार अर्ज करतात. यंदाही ही संख्या मोठी असून, वाढीव मुदतीमुळे उर्वरित उमेदवारांना मोठा आधार मिळाला आहे. उमेदवारांनी आता शेवटच्या क्षणाची वाट न पाहता अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज वेळेत पूर्ण करावेत, असे आवाहन परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.