वर्धा : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा यावर्षी चांगलीच गाजत आहे. पेपर फुटला म्हणून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या खात्याने घेतला. त्यावर कोक्रोच पार्टीने टीका सूरू केली. त्यातच ही फेरपरीक्षा कितपत सुरक्षित, अशी शंका घेणे सूरू झाले. पण केंद्र ठाम आहे. म्हणून ही सर्वोच्च परीक्षा प्रथम. इतर नंतर घ्या, असा सूर. तेच महाराष्ट्रात आता झाले आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ (MAHATET – 2026) पुढे ढकलण्यात आली आहे. पूर्वघोषित वेळापत्रकानुसार ही परीक्षा रविवार, २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्याच दिवशी राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाची ‘नीट’ (NEET) परीक्षा देखील आयोजित करण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षा परिषदेने महाटीईटीच्या तारखेत बदल केला आहे. आता ही परीक्षा रविवार २८ जून २०२६ रोजी घेण्यात येईल, अशी अधिकृत घोषणा परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतली जाणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ (MAHATET – 2026) पुढे ढकलण्यात आली आहे.

NEET परीक्षा आणि केंद्रांची समस्या

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे २१ जून २०२६ रोजी देशभरात ‘नीट’ प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) आणि नीट परीक्षेसाठी अनेक शहरांमध्ये एकच परीक्षा केंद्रे आल्यामुळे प्रशासकीय अडचण निर्माण झाली होती. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांना केंद्रावर पोहोचणे आणि परीक्षा केंद्रांचे नियोजन करणे कठीण झाले असते. विद्यार्थ्यांची अडचण आणि परीक्षांचा सुरळीत कारभार विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

असे सुधारित वेळापत्रक

  • प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करणे: उमेदवारांना १६ जून २०२६ ते २८ जून २०२६ या कालावधीत ऑनलाईन प्रवेशपत्र मिळतील.
  • शिक्षक पात्रता परीक्षा (पेपर १): रविवार, २८ जून २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी १:०० या वेळेत होईल.
  • शिक्षक पात्रता परीक्षा (पेपर २): रविवार, २८ जून २०२६ रोजी दुपारी २:३० ते संध्याकाळी ५:०० या वेळेत होईल.

वेळापत्रकात बदल शक्य

परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे की, अपरिहार्य किंवा प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकात बदल होऊ शकतात. उमेदवारांनी अधिकृत आणि ताज्या अपडेट्ससाठी नियमितपणे https://mahatet.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या निर्णयामुळे उमेदवारांना अभ्यासासाठी अतिरिक्त सात दिवसांचा कालावधी मिळाला आहे.