नागपूर: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर आजही ईश्वर, अल्ला तेरो नाम ही प्रार्थना वाजते. मात्र, हे मुळ गाणे पंडीत लक्ष्मचार्य यांनी लिहले होते. या गाण्यात कुठेही ईश्वर, अल्ला असा उल्लेखही नाही. मात्र, त्या गाण्याची चोरी करून महात्मा गांधी यांनी अल्ला हा शब्द घुसवला. ते या देशाचे राष्ट्रपीता कसे होऊ शकतात, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केली होती. यावर आता चांगलेच राजकारण तापले आहे.

काँग्रेस आणि गांधीवादी नेत्यांनी कुलश्रेष्ठ यांचा समाचार घेतला आहे. तसेच भाजप आणि आयोजकांवर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले की, महात्मा गांधी यांनी ईश्वर अल्ला तेरो नाम ही प्रार्थना एकतेसाठी सांगितली होती. देशात सर्व धर्मांमध्ये समानता राहावी म्हणून त्यांनी ही प्रार्थना सर्वांना सांगितली. याशिवाय महात्मा गांधींना राष्ट्रपिता हे नाव त्यांनी स्वतः दिले नसून सुभाषचंद्र बोस आणि रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेले आहे. त्यामुळे कुलश्रेष्ठ सारखा व्यक्ती जर राष्ट्रपिता या पदवीवरून टीका करत असेल तर तो एक प्रकारे सुभाषचंद्र बोस आणि रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान करत असल्याचा आरोपही अतुल लोंढे यांनी केला. भारत पाकिस्तान फाळणीसाठी महात्मा गांधींना दोष देत असतील तर ही त्यांची फार मोठी चुकी आहे. कारण देशाच्या फाळणीसाठी पाचही बोटं ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे जातात. हिंदू राष्ट्राचा ठराव सर्वात आधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडला होता.

स्वातंत्र्यपूर्व काळात, १९४० च्या दशकात (१९४१-४२ च्या सुमारास) हिंदू महासभेचे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी बंगाल प्रांतात मुस्लिम लीगसोबत युतीचे सरकार स्थापन केले होते. या सरकारमध्ये, अ. कृ. फजलुल हक मुख्यमंत्री होते आणि मुखर्जी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती, ज्याचा उद्देश त्यावेळच्या राजकारणात मुस्लिम लीगच्या प्रभावाला नियंत्रित करणे हा होता. त्यामुळे विभाजनासाठी महात्मा गांधींना दोष देताना कुलश्रेष्ठ यांनी इतिहास तपासावा असा सल्लाही लोंढे यांनी दिला. महात्मा गांधी हे विभाजनाच्या विरोधात होते. माझ्या मृतदेहावर विभाजन होईल असे गांधी बोलले होते. याचे उत्तर कुलश्रेष्ठ कधी देणार, नथुराम गोडसे याने गांधींची हत्या केली याचे उत्तर कुलश्रेष्ठ यांनी द्यावे असेही लोंढे म्हणाले.

गांधींनी या कार्यक्रमाचे आयोजन करावे हे दुर्दैव

सकल हिंदू समाज संमेलनानिमित्त नागपूरमध्ये आयोजित व्याख्यानात पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी महात्मा गांधी यांच्यावर टीका केली. या संमेलनाचे आयोजनात निशांत गांधी यांचा मोठा वाटा होता. गांधींवर टीका होणाऱ्या अशा एका कार्यक्रमाचे आयोजन गांधींनीच करावे हे दुर्दैव आहे अशी टीकाही टीका लोंढे यांनी केली.