‘माझे डोळे मिटल्यावर आणि हा देह भस्मभूत झाल्यावर माझ्या कामाविषयी निर्णय घेण्याकरिता लोकांकडे बराच वेळ शिल्लक राहील’. हे उद्गार आहेत महात्मा गांधींचे. याचा अर्थ एवढाच की मृत्यू झाल्यावर साऱ्या जगाने माझ्या कामाची चिकित्सा केली तरी चालेल. त्यासाठी सारे मोकळे आहेत.
अशी विधाने करायला विशाल मन लागते. ते गांधीकडे होते. त्यांना जाऊन आता ७८ वर्षे होत आली. अनेकजण त्यांना बरोबर ठरवतात तर काही चूक. या चिकित्सेविषयी कुणाचा आक्षेप असण्याचे काही कारण नाही. ती करतांना रास्त शब्दात त्यांच्यावर टीका होत असेल तर तीही मान्य. मात्र, त्यांना चोर ठरवणे, लायकी काढणे हे सर्वांर्थाने अमान्य. असले प्रकार म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे. ते एका पत्रकार म्हणवून घेणाऱ्यांकडून होत असतील तर आणखीच वाईट. लाज आणणारे.
अलीकडे सत्तेचे तळवे चाटणाऱ्या पत्रकारांची संख्या कमालीची वाढलीय. अशी शरणागती माध्यम जगतासाठी नवी नाही. कुणी कुणाला शरण जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र, हे करताना सत्ताधारी खूश होतील यासाठी काहीही बरळणे अयोग्य. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ नावाच्या कथित पत्रकाराने हाच अपराध केला. ते येथे येण्याच्या आधी कोण हे कुलश्रेष्ठ हे अनेकांना ठाऊकही नसेल. मात्र, त्यांनी आल्यावर जे अकलेचे तारे तोडले त्याची दखल घेणे क्रमप्राप्त. ते म्हणाले गांधी राष्ट्रपिता होण्याच्या लायकीचे नाहीत. का तर त्यांनी ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ हे भजन स्वत:च्या नावावर खपवले.
मूळात गांधींना राष्ट्रपिता ही पदवी बहाल केली सुभाषचंद्र बोसांनी. ते आझाद हिंद सेनेचे प्रमुख झाल्यावर केलेल्या भाषणात. गांधी व त्यांच्यात स्वातंत्र्य कसे मिळवायचे यावर मतभेद असूनही त्यांनी ही पदवी दिली. मग याच न्यायाने हे कथित पत्रकार बोस चुकले असे आज म्हणू शकतात का? अलीकडे बोस व पटेलांना तर उजव्यांनी उचलून धरलेले. याच महाशयाने गांधींवर चोरीचा आळ घेतला. यासाठी त्यांनी दिलेले उदाहरण अर्धसत्य.
गांधींच्या प्रार्थनेत म्हटले जाणारे हे भजन माझेच असा दावा गांधींनी कधीच केला नाही. तेव्हा देशभर गायले जाणारे हे भजन आपल्या प्रार्थनेचा भाग व्हावे एवढीच त्यांची अपेक्षा होती. मूळ भजनात अल्ला शब्द नव्हता, तो गांधींनी घुसवला हेही खरे. पण गांधींनी हे कशासाठी केले हे या कुलश्रेष्ठांना ठाऊक असूनही ते त्यावर बोलत नसतील तर ती लबाडी ठरते. जाती धर्मात विभागला गेलेला. तेव्हाचा समाज स्वातंत्र्यप्राप्तीसाठी एकजूट करायचा असेल तर सर्व धर्म, जाती समान असा संदेश देणे गरजेचे हे गांधींनी ओळखले होते. त्यांच्याही आधी टिळकांनीही हीच पद्धत अवलंबली होती. स्वातंत्र्य मिळवण्याचे ध्येय प्रत्येकात जागे करायचे असेल तर लोकांचे प्रबोधन गरजेचे. त्यासाठी त्यांनी संत परंपरा, धर्म याचा आधार घेतला. त्यातून हे भजन समोर आले. अशी सामाजिक ऐक्याची कृती या कुलश्रेष्ठांना चोरीचा मामला वाटत असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच.
आज सारेच उजवे ‘वसुधैव कुटूंबकम्’ म्हणतात. हे वचन आहे छांडोक्यांच्या उपनिषदामधले. ते सर्व जगाला लागू होते, केवळ एका धर्माला नाही. हे या कथित पत्रकाराला मान्य आहे का? ज्ञानेश्वरांनी ‘दूरितांचे तिमीर जावो’ असे म्हटले. म्हणजे गरिबांचे कल्याण होवो. यात त्यांनी फक्त हिंदूंचेच कल्याण व्हावे असे का म्हटले नसेल?
मुळात हे सारे संत, शास्त्री एका धर्माचा नाही तर जगाचा व त्यात राहणाऱ्या समस्त जनांच्या कल्याणाचा विचार करणारे होते. तोच गांधींनी केला असेल तर त्यांना चोर ठरवण्याचा उपद्व्याप हे कुलश्रेष्ठ कशासाठी करताहेत? तुकाराम महाराज म्हणायचे ‘अवघाची संसार सुखाचा करीन’. एवढेच काय तर महम्मद पैगंबरांनी सुद्धा ‘शेजारचे उपाशी झोपत असतील तर तुम्ही जेवायला नको’ असे कुराणात लिहून ठेवलेले. येशू म्हणाला ‘सारी ईश्वराची लेकरे’. या साऱ्यांनी त्यांच्या कृतीतून, वचनातून सर्वधर्मभाव जपला. तोच वारसा गांधींनी पुढे नेला तर त्याला अयोग्य कसे ठरवतो येईल? हा युक्तीवाद म्हणजे हे थोर संत व गांधींची तुलना नाही.
गांधी आयुष्यभर स्वत:ला सामान्य माणून समजत राहिले. झालेल्या चुकांची कबूली देत नव्याने शिकत राहिले. हे ठाऊक असूनही उचलली जीभ व लावली टाळ्याला अशा छापाची वक्तव्ये हे कुलश्रेष्ठ करीत असतील तर त्यांचे श्रेष्ठत्त्व किती पोकळ हेच दिसून येते. पुढे जात हेच महाशय म्हणाले की गांधी अहिंसेचे पुजारी नाहीत. कारण त्यांच्या हातात काठी व गीता होती. याच गीतेचा आधार घेत अर्जुन महाभारतात युद्ध लढला. कुलश्रेष्ठांच्या बुद्धीची कीव यावी असा हा युक्तीवाद.
हातात आधारासाठी काठी असणे हा हिंसक असण्याचा पुरावा ठरतो काय? म्हातारे झाल्यावर उजव्यांनी हाती काठी घेतली तर त्यांनाही हे महाशय हिंसक ठरवणार काय? गितेतले उपदेश केवळ युद्ध कसे लढावे एवढ्याच पुरते मर्यादीत आहेत काय? यातून जीवनाचे सार सांगीतले गेले त्याचे वाचन करायला हे महाशय विसरले काय?
गांधींना बदनाम करण्यासाठी सत्याचा अपलाप करायचा व उजव्यांच्या व्यासपीठावर मिरवायचे ही अलीकडे रुढ झालेली परंपरा. कुलश्रेष्ठ त्याचे पाईक. यातला शेवटचा मुद्दा आहे तो हे भाषण आयोजित करणाऱ्या आयोजकांसंदंर्भात. हिंदू संमेलनानिमित्ताने हे आयोजन झाले. अशी संमेलने घेण्यावर कुणाचा आक्षेप असण्याचे काही कारण नाही.
मात्र, त्यातून गांधींना लक्ष्य करण्यामागचे कारण काय? उजव्यांची सर्वोच्च संघटना असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणतो गांधी आम्हाला प्रात:स्मरणीय. याच विचाराचे सत्ताधारी उठसूठ गांधींचे नाव घेत असतात. मग त्याच विचारांच्या लोकांनी आयोजित केलेल्या या संमेलनात गाधींवर असभ्य शब्दात टीका होत असेल त र संघ चूप्पी का साधतो? स्वत: समोर न येता इतरांच्या माध्यमातून असे कार्यक्रम आयोजित करायचे व त्यातून गांधीद्वेषाची पेरणी करायची हे उजव्यांचे धोरण आहे का? असेल तर त्यांनी तसे स्पष्टपणे सांगावे. हा दुटप्पीपणा कशासाठी? कुलश्रेष्ठ यांचे भाषण आयोजित करणाऱ्यांची नावे बघा. त्यात असलेले सारे उजव्या वर्तुळात वावरणारे. त्यातला एका सुपूत्राचे वडीलही गांधींचा जप करतात. त्यांच्या नावाने पुरस्कार देतात.
दुसरीकडे हे सुपूत्र गांधींवरची अश्लाघ्य भाषेतली टीका मिटक्या मारत ऐकतात. हा ढोंगीपणा कशासाठी? एकतर पूर्णपणे उजवे व्हा, डावे व्हा अन्यथा मध्यममार्गी व्हा. सर्वत्र उठबस करुन या आयोजकांना काय मिळवायचे आहे?
उजव्यांची अडचण अशी की त्यांना गांधी पूर्णपणे स्वीकारताही येत नाही वा नाकारताही येत नाही. यातला मधला मार्ग सापडत नाही म्हणून गांधींवर अशी टीका योग्य कशी ठरु शकते? गांधी या जगाचे नेते होते. केवळ एका धर्माचा विचार करणाऱ्यांना ते पेलणारे नाहीत हेच वारंवार दिसून येते.

