वर्धा : महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता ही सर्वमान्यता. पण तरीही या महापुरुषाचा द्वेष जाहीर करणारी काही मंडळी आहेच. त्यामुळे गांधी प्रतिमेवर गोळया झाडण्याचे निंदनीय प्रकार भारतभू मध्ये पूर्वी घडले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यात असतांना तेथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याचे कर्तव्य पार पाडतात. पण ईथे ?
गांधी पुतळ्याचा अनादर
पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यातील कटवा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचा अनादर केल्याची एक अत्यंत संतापजनक आणि निंदनीय घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वृत्तानुसार १ जुलै २०२६ रोजी काही अज्ञात समाजकंटकांनी कटवा येथील गांधीजींच्या पुतळ्याचे तोंड काळ्या कापडाने झाकून टाकले. या घटनेनंतर देशभरातील गांधीवादी विचारसरणीचे नागरिक आणि सर्वोदय समुदायातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या लाजीरवाण्या घटनेची गंभीर दखल घेत ‘सर्व सेवा संघ’चे अध्यक्ष चंदन पाल यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना एक अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ आणि कडक कायदेशीर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली आहे.
जागतिक स्तरावर देशाच्या प्रतिमेला धक्का
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात सर्व सेवा संघाच्या अध्यक्षांनी तीव्र दुःख व्यक्त करताना म्हटले आहे की महात्मा गांधींनी केवळ भारताच्या स्वातंत्र्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले होते. त्यांचा मार्ग सत्य, अहिंसा आणि प्रेमाचा होता. अशा महान जागतिक विभूतीचा अनादर करणे हे संपूर्ण देशासाठी कलंक आणि अपमानास्पद आहे. पत्रात या मुद्द्यावर विशेष भर देण्यात आला आहे की, जेव्हा जेव्हा जगातील मोठे नेते आणि राष्ट्राध्यक्ष भारतात येतात, तेव्हा ते सर्वप्रथम दिल्लीतील गांधी समाधी (राजघाट) येथे जाऊन राष्ट्रपित्याला आदरांजली वाहतात. नुकत्याच पार पडलेल्या जी-२० शिखर परिषदेदरम्यानही संपूर्ण जगाने महात्मा गांधींबद्दल जागतिक नेत्यांचा असलेला हा आदर पाहिला आहे.
भारताच्या भूमीवर अशी घटना दुर्दैवी
चंदन पाल यांनी पत्रात पुढे नमूद केले आहे की एकीकडे भारताचे पंतप्रधान आपल्या सेशेल्स दौऱ्यादरम्यान राष्ट्रपित्याच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात, तर दुसरीकडे आमच्या स्वतःच्याच भूमीवर अशा लज्जास्पद घटना घडत आहेत. हे केवळ क्लेशदायक नसून, यामुळे जागतिक समुदायात देशाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो.
तत्काळ तपास आणि अटकेची मागणी
सर्व सेवा संघाने राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या घटनेमागे असलेल्या समाजकंटकांचा शोध घेण्यासाठी त्वरित उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात यावेत. समाजात द्वेष आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाऊ नये, असे संघटनेने म्हटले आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलीसही सतर्क झाले असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. दोषींना लवकरात लवकर अटक न केल्यास गांधीवादी विचारसरणीशी जोडलेले सर्व नागरिक शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करतील, असा इशाराही सर्वोदय समुदायाकडून देण्यात आला आहे.
