नागपूर : महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या संस्थेच्या आस्थापनेवरील गट ‘ब’ मधील प्रकल्प कार्यकारी अधिकारी व गट-‘क’ मधील प्रकल्प अधिकारी व लेखापाल ही पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. मात्र, यात प्रकल्प कार्यकारी अधिकारी पदासाठी नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील पाच ते सात वर्षाच्या अनुभवाची अट देताना खासगी क्षेत्रातील अनुभवाच्या दर्जाविषयी कुठलीही स्पष्टता नाही.
जाहिरातीमधील या गोंधळामुळे निम्न दर्जाच्या खासगी कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव दाखवून अशा बनावट उमेदवारांचा पदभरतीमध्ये भरणा होण्याची भीती, शासकीय क्षेत्रामधील कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांच्या मनात आहे. राज्यातील अपारंपरिक व ऊर्जा स्त्रोतांचा विकास करणाऱ्या ‘महाऊर्जा’ संस्थेच्या आस्थापनेवरील पदे सरळसेवेने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून https://www.mahaurja.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत.
यामध्ये प्रकल्प कार्यकारी अधिकारी १८, प्रकल्प अधिकारी २२ आणि लेखापाल २ अशी पदे भरली जाणार आहेत. या तीन्ही पदांसाठी शैक्षणिक अर्हता आणि अनुभवाची अट आहे. यात प्रकल्प कार्यकारी अधिकारी पदासाठी शैक्षणिक अर्हतेसोबत नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील खासगी अथवा शासकीय क्षेत्रातील अनुभवाची अट आहे.
मात्र, खासगी क्षेत्रातील कुठल्या दर्जाच्या कंपन्यांमधला अनुभव असावा, याचा स्पष्ट उल्लेख जाहिरातीमध्ये नाही. त्यामुळे निम्न दर्जाच्या कंपन्यांमधील बनावट अर्जदारांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे शासकीय क्षेत्रातील कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांच्या मनात हा संभ्रम असून केवळ शासकीय अनुभव असणाऱ्यांनाच संधी द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
जाहिरातीमधून धोका काय?
यापूर्वी नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रामधील इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी(इरेडा) आणि भारतीय सौर ऊर्जा महामंडळाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यामध्ये खाजगी क्षेत्रातील अनुभवाकरिता स्पष्टपणे वार्षिक वेतनाचे विवरण पत्र(सीटीसी)जोडणे नमूद केला होता. उदाहरणार्थ इरेडाच्या जानेवारी २०२५ जाहिरातीमध्ये वेतन ६०,००० ते १,८०,००० असणाऱ्या प्रस्तावित व्यवस्थापक पदाकरिता खाजगी क्षेत्रातील अनुभव असल्यास ‘सीटीसी’ २९.१८ लाख वार्षिक असल्याची अट स्पष्टपणे नमूद होती. भारतीय सौर ऊर्जा महामंडळाच्या जाहिरातीमध्ये खासगी क्षेत्रासाठी ‘सीटीसी’ची अट देण्यात आली होती. मात्र, महाऊर्जाच्या जाहिरातीमध्ये खासगी क्षेत्रातील अनुभवासंदर्भात असा कुठलाही स्पष्ट उल्लेख नाही. यामुळे अनेक उमेदवार हे कुठल्याही निम्न दर्जाच्या खासगी संस्थेमधील कामाचे अनुभव प्रमाणपत्र अर्जासोबत जोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदभरतीमध्ये बनावट उमदेवारांच्या भरतीची भीती आहे. त्यामुळे केवळ प्रकल्प कार्यकारी अधिकारी या पदाच्या तुलनात्मक व साजेसा शेवटच्या वर्षाचा वार्षिक वेतन असणाऱ्या शासकीय व इरेडा आणि भारतीय सौर ऊर्जा महामंडळाने अवलंबलेल्या प्रचलित पद्धतीनुसार पदाला तुल्यबळ व तुलनात्मक ‘सीटीसी’ नमूद करून खासगी क्षेत्रातील अनुभव असण्याबाबत मागणी होत आहे.
