भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हजेरी लावली. यावेळी बावनकुळे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी माझ्याविरोधात आणि आमच्या २१ पदाधिकाऱ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यामुळे आज न्यायालयात यावं लागलं.
बावनकुळे म्हणाले की, आज न्यायालयात आलो नसतो तर माझ्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं असतं. आम्ही न्यायालयाला विनंती केली आहे की, चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविकास आघाडी जाणीवपूर्वक माझ्यावर सूड उगवत आहे. आम्ही न्यायालयात पुरावे सादर करू, आमचं म्हणणं न्यायालय नक्कीच ऐकेल असा मला विश्वास आहे. भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या खटल्यांमध्ये अडकवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे.