नागपूर : वीजबिल थकले म्हणून वीजजोडणी कायमस्वरूपी तोडली गेली आहे? थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकारामुळे मूळ रकमेपेक्षा अधिक भरणा करण्याची वेळ आली आहे? अशा ग्राहकांसाठी महावितरणने दिवाळीच्या निमित्ताने मोठी सवलत जाहीर केली आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या बिगरकृषी ग्राहकांसाठी शुक्रवारपासून (ता. ६) ‘अभय योजना २०२६-२७’ लागू होत आहे. या योजनेत थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होणार असून, मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. विशेष म्हणजे, थकबाकी भरण्यासाठी हप्त्यांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही योजना १५ जानेवारी २०२७ पर्यंत सुरू राहणार आहे.

अभय योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि अन्य बिगरकृषी ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनाही ही योजना लागू आहे. मात्र, कृषिपंप आणि सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजनांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. महावितरणच्या वितरण फ्रँचायझी क्षेत्रातील ग्राहकांनाही याचा लाभ मिळेल.

थकबाकीत नेमकी किती सवलत मिळणार?

ग्राहकांच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराची संपूर्ण रक्कम म्हणजेच १०० टक्के माफ केली जाणार आहे. याशिवाय मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास अतिरिक्त सवलत मिळेल. १५ डिसेंबर २०२६ पर्यंत एकरकमी भरणा करणाऱ्यांना विशेष सवलत दिली जाणार आहे. तीन वर्षांपर्यंत वीजजोडणी खंडित असलेल्या लघुदाब घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना १० टक्के, तर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ वीजजोडणी खंडित असलेल्यांना २० टक्के सूट मिळेल. अन्य लघुदाब आणि उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे १० आणि १५ टक्के सवलत मिळणार आहे.

एकरकमी पैसे भरणे शक्य नसेल तर काय?

थकबाकी भरण्यासाठी ग्राहकांना हप्त्यांचा पर्यायही देण्यात आला आहे. लघुदाब ग्राहकांना एकूण मूळ थकबाकीच्या ५० टक्के रक्कम सुरुवातीला भरावी लागेल. उर्वरित रक्कम सहा समान मासिक हप्त्यांत भरता येईल. या हप्त्यांवर व्याज आकारले जाणार नाही. उच्चदाब ग्राहकांना त्यांच्या थकबाकीनुसार तीन ते सहा व्याजमुक्त हप्त्यांची सुविधा उपलब्ध असेल.

स्मार्ट मीटर बसवल्यास आणखी सवलत मिळेल का?

होय. मंजूर वीजभार २० किलोवॉटपर्यंत असलेल्या ग्राहकांनी वीजजोडणी पुन्हा सुरू करताना पूर्वभरणा पद्धतीच्या स्मार्ट मीटरचा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीत अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळेल. याशिवाय योजनेत सहभागी होणाऱ्या सर्व ग्राहकांचे वीजजोडणी पुन्हा सुरू करण्याचे शुल्क आणि लघुदाब ग्राहकांचे सेवा जोडणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

राज्यात किती ग्राहकांना याचा फायदा होणार?

३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ३४ लाख ८६ हजार ३४८ ग्राहकांकडे एकूण ७ हजार ६५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यात २ हजार ९२ कोटी रुपये व्याज आणि विलंब आकाराचे आहेत. हे संपूर्ण शुल्क माफ होणार आहे. तसेच तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या आणखी २ लाख ६० हजार ८२९ ग्राहकांकडे ४८८ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी असून, त्यातील १६३ कोटी ९३ लाख रुपयांचे व्याज माफ होणार आहे.

योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?

महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल अॅपवरून ग्राहकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईतील प्रकाशगड मुख्यालयात या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत आहे. थकबाकीमुळे वीजजोडणीपासून दूर राहिलेल्या ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.