अमरावती: महावितरणमार्फत कृषिपंपांना दिवसा आणि रात्री अशा चक्राकार पद्धतीने वीज पुरवठा केला जातो. वीज पुरवठा सुरू झाल्यावर शेतात जाऊन कृषिपंप सुरू करण्याचा त्रास टाळण्यासाठी अनेक शेतकरी ऑटोस्विच लावतात. पण, वीज येताच सर्व पंन एकाचवेळी सुरू झाल्याने रोहित्रावरील भार प्रचंड वाढतो आणि परिणामी रोहित्र जळण्याचे किंवा नादुरूस्त होण्याचे प्रकार घडतात. ऐन हंगामात रोहित्र जळाल्यास वीज पुरवठा खंडित होऊन शेतकऱ्यांचे सिंचन थांबते, पिकांची हानी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषिपंपांना ऑटोस्विच न बसवता अनिवार्यपणे कॅपॅसिटर बसवावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणकडून कॅपॅसिटरची जनजागृती
कॅपॅसिटरची कृषीपंपाला गरज काय? आणि कॅपॅसिटर सुरळीत वीज पुरवठ्यासाठी कसे काम करते, याबाबत परिमंडळात मोहिम उघडण्यात आली असून या मोहिमेत क्षेत्रीय अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना कॅपॅसिटरच्या फायद्याबाबत माहिती द्यावी आणि कृषिपंपाला कॅपॅसिटर लावण्याबाबत प्रवृत्त करावे असे निर्देश देण्यात आले आहे.
ट्रान्सफॉर्मर का जळतात?
कृषिपंपांमध्ये ‘इंडक्शन मोटर’चा वापर केला जातो, ज्या सुरू असताना सुमारे ३० टक्के जास्त अतिरिक्त इंडक्टिव्ह करंट वीज वाहिन्यांवरून खेचतात. यामुळे विद्युत वाहिन्यांवर प्रचंड ताण येऊन ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड होतात आणि जळून खाक होतात. या समस्येवर कॅपॅसिटर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. कॅपॅसिटर हे उपकरण पंपाला लागणारी ‘रिॲक्टिव्ह पॉवर’ थेट पुरवते, ज्यामुळे लाईनवरून वाहणारा अतिरिक्त वीज प्रवाह ३० टक्क्यांपर्यंत कमी होतो. यामुळे वीज यंत्रणेवरील ताण मोठ्या प्रमाणावर हलका होऊन ट्रान्सफॉर्मर जळणे आणि तारा तुटण्याच्या घटनांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते.
अत्यल्प खर्चात कॅपॅसिटर उपलब्ध
बाजारात एल अँड टी, कॅपको, हॅवेल्स यांसारख्या नामांकित कंपन्यांचे कॅपॅसिटर सहज उपलब्ध असून अवघ्या ३०० ते ५०० रुपयांच्या नाममात्र खर्चात हजारो रुपयांची मोटार जळण्यापासून वाचवता येते. यामध्ये ३ एचपी मोटारीसाठी १ केव्हीएआर, ५ एचपी मोटारीसाठी २ केव्हीएआर, तर ७.५ एचपी मोटारीसाठी ३ केव्हीएआर क्षमतेचा कॅपॅसिटर वापरणे आवश्यक आहे.
ऑटोस्विचमुळे मोठे नुकसान
ऑटोस्विचमुळे ट्रान्सफॉर्मरवर अचानक प्रचंड भार येऊन ते जळणे, लाईन ट्रिप होणे आणि विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. ही गंभीर समस्या टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑटोस्विच तात्काळ काढून कृषिपंपाला योग्य क्षमतेचा ‘कॅपेसिटर’ बसवावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.
